राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या कानपूर दौऱ्यादरम्यान गर्दीत अॅम्ब्युलन्स अडकल्याने एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना चांगलीच चर्चेत आहे. या घटनेपासून धडा घेत लखनौ पोलिसांनी आता दोन दिवसीय हेल्पलाईन नंबर सुरु केला आहे. व्हीव्हीआयपी लोकांच्या दौऱ्यादरम्यान तसंच ट्रॅफिक वळवण्यात आल्यामुळे कुठलीही अॅम्ब्युलन्स अडकून राहू नये यासाठी हा हेल्पलाईन नंबर असणार आहे.

जर राष्ट्रपती किंवा इतर कोणाही लोकप्रतिनिधीचा दौरा असेल किंवा अशी परिस्थिती निर्माण झाली असेल ज्यामुळे अॅम्ब्युलन्स गर्दीत अडकली असेल तर अशावेळी संबंधितांनी ६३८९३०४१४१, ६३८९३०४२४२ आणि ९४५४४०५१५५ या क्रमांकावर कॉल करावा आणि आपल्याविषयीची माहिती द्यावी. त्यांच्यासाठी रस्ता रिकामा केला जाईल अथवा दुसरा पर्याय उपलब्ध करुन दिला जाईल.

हेही वाचा- ट्रॅफिकमध्ये अडकल्याने रुग्णालयात जाणाऱ्या महिलेचा मृत्यू; राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी व्यक्त केला शोक

राष्ट्रपतींच्या या दौऱ्यामुळे शहरात अनेक ठिकाणी वाहतुकींच्या रस्त्यांमध्ये बदल करण्यात आले आहेत. यामुळे झालेल्या ट्रॅफिकमध्ये अडकून एका महिलेचा मृत्यू झाला होता. महिलेला उपचारासाठी रुग्णालयात नेले जात असताना गोविंदपुरी पुलावर वाहतूक बंद करण्यात आली होती. यावेळी ट्रॅफिकमध्ये अडकलेल्या महिलेची प्रकृती अधिकच बिकट झाली आणि जेव्हा रुग्णालयात पोहोचली तेव्हा खूप उशीर झाला होता. डॉक्टरांनी महिलेला मृत घोषित केले.

भारतीय उद्योग संघटनेच्या स्थानिक महाविद्यालयाच्या महिला शाखेच्या अध्यक्ष वंदना मिश्रा (५०) शुक्रवारी गोविंदपुरी पुलावरील ट्रॅफिकमध्ये अडकल्या होत्या. राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या भेटीमुळे येथे वाहतूक बंद करण्यात आली होती. ४५ मिनिटे या रस्त्यावरील वाहतूक बंद करण्यात आली होती अशी माहिती देण्यात आली आहे. ट्रॅफिक सुटल्यानंतर वंदना यांना रुग्णालयामध्ये पोहोचण्यासाठी सुमारे दीड तास लागला. त्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. गोविंदपुरी पुलावर तैनात असलेल्या पोलिसांना वारंवार विनंती करूनही रस्ता उघडला गेला नाही, असा आरोप परिवाराने केला आहे. त्यानंतर कानपूरचे पोलिस आयुक्त असीम अरुण यांनी या घटनेबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे. दरम्यान, या प्रकरणात पोलीस उपनिरीक्षक आणि तीन हेड कॉन्स्टेबलना निलंबित करण्यात आले आहे.