काही मतदारांना त्यांना मिळालेल्या मतदानाच्या अधिकाराचे महत्त्वच कळत नाही, अशी खंत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी शनिवारी व्यक्त केली. काही देशांमध्ये मतदानाचा अधिकार मिळण्यासाठी जनतेला झगडावे लागते याचे स्मरणही या वेळी कोविंद यांनी करून दिले.

निवडणूक आयोगाची स्थापना झाली तो दिवस मतदार दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात राष्ट्रपती बोलत होते. पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीपासून ते गेल्या वर्षी झालेल्या १७ व्या लोकसभा निवडणुकीपर्यंत मतदारांनी जगभरात भारतीय लोकशाहीची विश्वासार्हता वाढविली आहे, असेही कोविंद म्हणाले.

यासाठी आपण सर्व मतदारांचे अभिनंदन करतो, परंतु आजमितीलाही काही मतदारांना मतदानाचे महत्त्वच समजत नाही, जगातील लोकशाही असलेल्या बहुसंख्य देशांमध्ये सर्वसामान्य जनतेला मतदानाचा अधिकार मिळण्यासाठी संघर्ष करावा लागला आणि अनेकांनी त्यासाठी त्यागही केला आहे, असेही राष्ट्रपतींनी नमूद केले.

इंग्लंडसारख्या जुन्या लोकशाहीत महिलांना मतदानाचा समान अधिकार २० व्या शतकात म्हणजेच जवळपास तीन दशकांच्या संघर्षांनंतर मिळाला याकडे कोविंद यांनी लक्ष वेधले.

मतदार दिनानिमित्त पंतप्रधानांच्या शुभेच्छा

नवी दिल्ली : राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. निवडणूक प्रक्रिया अधिकाधिक सहभागात्मक होण्यासाठी घेतलेल्या प्रयत्नांबद्दल देश निवडणूक आयोगाबद्दल कृतज्ञता व्यक्त करीत आहे, असे मोदी यांनी म्हटले आहे. निवडणूक आयोगाची स्थापना २५ जानेवारी १९५० रोजी झाली.