मुंबईतील १९९३ सालच्या साखळी बॉम्बस्फोटातील दोषी याकुब मेमनचा दयेचा अर्ज राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी फेटाळला. याकुब हा मुंबई बॉम्बस्फोटातील प्रमुख सुत्रधारांपैकी एक असणाऱ्या टायगर मेमनचा भाऊ आहे. याकुब मेमनला सध्या नागपूर येथील कारागृहात ठेवण्यात आले असून, राष्ट्रपती कार्यालयाकडून यासंबंधीची माहिती महाराष्ट्र शासनाला देण्यात आली आहे. मुंबई बॉम्बस्फोट खटल्यातील दोषी म्हणून सर्वोच्च न्यायालयाने मागील वर्षी याकुब मेमनला फाशीची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर ऑक्टोबर २०१३मध्ये याकुबने फाशीपासून आपल्याला सुटका मिळावी, यासाठी राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज केला होता. राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी आतापर्यंत ११ दोषींचे दया अर्ज फेटाळले असून, सध्या राष्ट्रपती कार्यालयाकडे चार दया अर्ज प्रलंबित आहेत.