शिक्षक दिन शनिवारी असला तरी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी सरांनी आजच दिल्लीतील डॉ. राजेंद्रप्रसाद सवरेदय विद्यालयात मुलांचा राजकीय इतिहासाचा तास घेतला. भारतात राष्ट्रपतींनी शाळेत जाऊन विद्यार्थ्यांना समकालीन राजकारणातील त्यांच्या कारकिर्दीशी संबंधित आठवणी सांगण्याची ही पहिलीच वेळ होती.
राष्ट्रपतींना शाळेत बोलावण्याची कल्पना मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची होती. मुखर्जी सर काय सांगतात याबाबत विद्यार्थ्यांना उत्सुकता होती, कारण गेली चाळीस वर्षे ते सक्रिय राजकारणात आहेत. मुखर्जी (वय ७९ ) यांचा इतिहास हा हातखंडा विषय असून ४६ वर्षांनंतर त्यांनी शिक्षक म्हणून शिकवले. त्यांचे विद्यार्थ्यांशी लगेचच सूर जुळले, तुम्हाला जर कंटाळा आला तर मुखर्जी सर आता थांबा असे तुम्हीच सांगा असे त्यांनी मुलांना सांगितले. आता मी राष्ट्रपती किंवा मंत्री कुणी नाही तुमचे मुखर्जी सर आहेत असे समजा, त्यांच्या या सांगण्याने विद्यार्थ्यांमधील भीती पळून गेली. मुखर्जी यांनी लोकशाहीचा चौथा खांब असलेली माध्यमे व स्वयंसेवी संस्था तसेच समाज माध्यमांचे वाढते महत्त्व सांगितले. हे घटक समाज मत घडवित असतात व त्यातून निकोप लोकशाही तयार होते असे ते म्हणाले. भारतीय लोक प्रयोग करतात, ते समाधानी नाहीत, आपण आणखी चांगले काही करू शकणार नाही का, आणखी प्रगती करू शकणार नाही का, असे त्यांचे विचारणे असते.
मुखर्जी यांनी राजकीय इतिहासाबरोबरच अर्थकारणातील बदल सांगितले, माजी पंतप्रधान नरसिंहराव व तत्कालीन अर्थमंत्री मनमोहन सिंग यांनी आर्थिक सुधारणा सुरू केल्या, नंतर यूपीए सरकारने मनरेगा योजना सुरू केली, देश अन्नधान्य आयात करीत होता आता निर्यात करतो, पोलाद, सिमेंट, वीज क्षेत्रातील प्रगती, राज्य घटना निर्मितीचे महत्त्व असे अनेक मुद्दे त्यांनी मांडले.