वॉशिंग्टन : अमेरिकी काँग्रेसच्या पहिल्या हिंदू सदस्य आणि आगामी अध्यक्षपदाच्या संभाव्य उमेदवार असणाऱ्या तुलसी गबार्ड यांनी गूगलवर ‘भेदभाव’ केल्याचा आरोप करून ५० दशलक्ष डॉलरचा दावा केला आहे.

तुलसी यांनी गूगलवर आरोप केला आहे की, गूगलने त्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणली असून त्यांच्या प्रचार प्रक्रियेमध्ये भेदभाव केला आहे. २०२० मध्ये होणाऱ्या राष्ट्राध्यक्षाच्या निवडणुकीसाठी डेमोक्रेटिक पक्षाकडून उमेदवारी मिळवण्यासाठी २० हून अधिक जण मैदानात असून ३८ वर्षीय गबार्ड त्यापैकी एक आहेत.

गबार्ड यांच्या निवडणूक प्रचार समितीनुसार २७ आणि २८ जून रोजी झालेल्या प्राथमिक चर्चेनंतर गूगलने त्यांच्या प्रचार अभियानाशी निगडित जाहिरातींचे खाते सहा तासांसाठी बंद केले होते. त्यामुळे त्यांना मतदारांपर्यंत पोहोचण्यात आणि निधी मिळवण्यात अडथळा निर्माण झाला, असा आरोप गबार्ड यांनी  केला आहे.

यावर गूगलचे प्रवक्ते जोस कास्टानेडा यांनी गूगलची भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, जाहिरात करणाऱ्यांच्या खात्यामधून विपरित क्रियेतून कोणतीही फसवणूक होऊ नये, यासाठी गूगलची स्वयंचलित यंत्रणा खाते चिन्हांकित करत असते. गबार्ड यांच्याबाबतीतही तेच झाले आहे. आमच्या यंत्रणेने खात्याचे कामकाज थांबवून पुन्हा ते कार्यान्वित केले.