राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचा राष्ट्रपती पदाचा कार्यकाळ जुलैमध्ये संपत असून, पुढील राष्ट्रपती कोण असेल याबाबत राजकीय क्षेत्रात मोठी चर्चा सुरु आहे. या पदासाठी भाजपच्या विरोधात उमेदवार उभा करण्याची विरोधी पक्षाची तयारी चालू असली तरीही विरोधी पक्षात एक गट असाही आहे जो राष्ट्रपतीपदासाठी भाजपाला समर्थन करण्यास तयार आहे. ‘इकॉनॉमिक्स टाइम्स’ने दिलेल्या माहितीनुसार, जर भाजपने सध्याचे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना पुन्हा राष्ट्रपतीपदासाठी संधी दिली तर विरोधी पक्ष याला विरोध करणार नाही.

राष्ट्रपतीपद निवडणूक प्रक्रिया समजून घ्या सहजपणे…

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच्या इतिहासात देशाचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांना दोन वेळा राष्ट्रपतीपदाची संधी मिळाली होती. प्रणव मुखर्जी पुन्हा राष्ट्रपती झाले तर दोनदा राष्ट्रपतीपद मिळविणारे ते दुसरे राष्ट्रपती असतील. विरोधी पक्षाला प्रणव मुखर्जी यांचे नाव यंदाच्या राष्ट्रपतीपदाच्या निवडीसाठी सुचवायचे नाही. तर राष्ट्रीय लोकशाही आघाडीने आपले नाव आधी जाहीर करावे अशी विरोधी पक्षाला आशा आहे. दुसरीकडे मात्र काँग्रेस अध्यक्षा सेनिया गांधी, बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, मायावती, शरद यादव यांची भेट घेत आहेत.

लालकृष्ण अडवाणी, सुषमा स्वराज, मुरली मनोहर जोशी या भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची नावेही बरीच चर्चेत आहेत. २०१२ मध्ये राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीसाठी प्रणव मुखर्जी यांचे नाव चर्चेत आले होत तेव्हा भाजपचे मित्रपक्ष असलेल्या संयुक्त जनता दल आणि शिवसेनेनेही या नावाला पाठिंबा दिला होता. याशिवाय २०१२ मध्ये भाजपने पीए संगमा यांनाही पाठिंबा दिला होता.
राष्ट्रपतीपदासाठी लोकसभा, राज्यसभा आणि सर्व राज्यांच्या विधानसभा येथील प्रतिनिधी मतदान करत असतात. यात दिल्ली आणि पॉंडिचेरी या केंद्रशासित प्रदेशांच्या मतांचाही समावेश असतो. त्यामुळे राष्ट्रपतीपदाची चुरस चांगलीच रंगणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.