एनडीएचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार कोण असतील याची उत्सुकता आता संपुष्टात आली आहे. बिहारचे राज्यपाल रामनाथ कोविंद हे एनडीएचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार असतील अशी घोषणा भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी सोमवारी केली. दलित समाजातून येणाऱ्या कोविंद यांना राष्ट्रपतीपदाची उमेदवारी देऊन या समाजाला भाजपकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न मोदी-शहा जोडीने केला आहे.

विद्यमान राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची कारकिर्द २४ जुलैरोजी संपणार आहे. नव्या राष्ट्रपतींनी २५ जुलैरोजी पदभार स्वीकारणे अपेक्षित आहे. राष्ट्रपतीपदासाठी १७ जुलै रोजी मतदान आणि वीस जुलै रोजी मतमोजणी होणार आहे. निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होताच एनडीए आणि यूपीएकडून उमेदवार कोण असतील यावर चर्चा सुरु होती.

एनडीएकडून लालकृष्ण अडवाणी, सुषमा स्वराज, लोकसभा सभापती सुमित्रा महाजन, केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री थावरचंद गेहलोत, झारखंडच्या राज्यपाल द्रौपदी मूरमू, ज्येष्ठ अणुसंशोधक डॉ. अनिल काकोडकर यांचे नाव चर्चेत होते. पण मोदी- शहा जोडीने या सर्व शक्यता फेटाळून लावत पुन्हा एकदा सर्वांना धक्का दिला आहे. भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेत राष्ट्रपतीपदाचा उमेदवार जाहीर केला. बिहारचे राज्यपाल रामनाथ कोविंद हे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार असतील असे त्यांनी सांगितले. शिवसेनेला नाव कळवले असून नाव कळवल्यानंतर शिवसेना भूमिका जाहीर करणार असल्याचे शहांनी स्पष्ट केले. दलित समाजातून येणाऱे रामनाथ कोविंद यांनी मागासवर्गीयांसाठी नेहमीच संघर्ष केला असल्याचे शहा यांनी आवर्जून सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोनिया गांधी आणि मनमोहन सिंग यांच्याशी चर्चा केली आहे. सोनिया गांधी चर्चा करुन अंतिम निर्णय कळवतील असे शहा यांनी म्हटले आहे.

जाणून घ्या कोण आहेत रामनाथ कोविंद

कोविंद यांचा जन्म १ ऑक्टोबर १९४५ रोजी उत्तर प्रदेशच्या कानपूरमध्ये झाला. १९७४ मध्ये त्यांनी सविता यांच्याशी विवाह केला. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. कोविंद हे कॉमर्समधील पदवीधर असून कानपूर विद्यापीठातून एलएलबी केले. १९७७ ते १९७९ या कालावधीत ते दिल्ली हायकोर्टात केंद्र सरकारचे वकील होते. १९७८ पासून त्यांनी सुप्रीम कोर्टातही वकील म्हणून काम करायला सुरुवात केली.  १९९१ पासून ते राजकारणात सक्रीय आहेत.