ज्येष्ठ शेतीतज्ज्ञ एम. एस. स्वामिनाथन यांना काँग्रेसकडून राष्ट्रपतीपदासाठी उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे रामनाथ कोविंद विरुद्ध एम. एस. स्वामिनाथन असा मुकाबला रंगण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येते आहे. शिवसेनेने याआधी स्वामिनाथन यांचे नाव राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी सुचवले होते. मात्र भाजपने राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडून बिहारचे राज्यपाल रामनाथ कोविंद यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले. त्यामुळे आता काँग्रेस स्वामिनाथन यांना उमेदवारी देणार असल्याचे वृत्त इंडिया टुडे या संकेतस्थळाने दिले आहे.

भाजपने ‘दलित’ कार्ड खेळल्यावर आता काँग्रेसकडून ‘शेतकरी’ कार्ड खेळले जाणार असल्याची शक्यता आहे. याआधी शिवसेनेने शेतीतज्ज्ञ एम. एस. स्वामिनाथन यांना राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडून उमेदवारी दिली जावी, अशी मागणी भाजपकडे केली होती. स्वामिनाथन यांच्या आधी शिवसेनेने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांचे नाव सुचवले होते.

देशातील हरितक्रांतीचे जनक स्वामिनाथन यांना राष्ट्रपतीपदाची उमेदवारी दिली जावी, असा आग्रह शिवसेनेने धरला होता. मात्र शिवसेनेची ही मागणी पूर्णत्वास न गेल्याने याचा फायदा आता काँग्रेसकडून घेतला जाण्याची शक्यता आहे. भाजप-शिवसेनेमधील संबंधांची दरी आणखी वाढवायची आणि शिवसेनेची मते आपल्या उमेदवाराकडे वळवायची, अशी दुहेरी योजना काँग्रेसकडून आखण्यात आल्याची माहिती समोर येते आहे. भाजप आणि शिवसेनेचे संबंध २०१४ च्या लोकसभा निवडणुकीनंतर मोठ्या प्रमाणात ताणले गेले आहेत.

लोकसभेच्या माजी अध्यक्षा मीरा कुमार, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, भारिप बहुजन महासंघाचे नेते आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू प्रकाश आंबेडकर आणि निवृत्त राजदूत गोपाळ कृष्ण गांधी अशी काही नावदेखील काँग्रेसकडून चर्चेत आहेत. सुशीलकुमार शिंदे यांना उमेदवारी दिली गेल्यास त्यांना राष्ट्रवादीचा पाठिंबा मिळू शकतो. याशिवाय शिवसेनेने राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाजपची साथ सोडल्यास सुशीलकुमार शिंदे यांना फायदा होऊ शकतो.