16 December 2017

News Flash

Presidential Election 2017 : जाणून घ्या कोण आहेत रामनाथ कोविंद

एनडीएच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराची संपूर्ण ओळख

लोकसत्ता ऑनलाइन | Updated: June 19, 2017 2:51 PM

रामनाथ कोविंद राष्ट्रपती प्रणव मुखर्जींसोबत (संग्रहित)

राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडून रामनाथ कोविंद यांचे राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी जाहीर करण्यात आले आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी पत्रकार परिषद घेऊन रामनाथ कोविंद यांच्या नावाची घोषणा केली आहे. भाजपकडून राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी दलित चेहऱ्याला संधी दिली जाईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात होती. रामनाथ कोविंद यांच्या निवडीमुळे ही चर्चा खरी ठरली आहे. सध्या रामनाथ कोविंद बिहारचे राज्यपाल म्हणून काम पाहात आहेत.

भाजपचा दलित चेहरा अशी रामनाथ कोविंद यांची ओळख आहे. भाजपच्या अनेक दिग्गज नेत्यांची नावे राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी चर्चेत होती. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी उमेदवाराबद्दलचा सस्पेन्स कायम ठेवला होता. रामनाथ कोविंद मूळचे उत्तरप्रदेशच्या कानपूरचे आहेत. कानपूरमधील पराऊंख गावात १ ऑक्टोबर १९४५ रोजी रामनाथ कोविंद यांचा जन्म झाला. रामनाथ कोविंद कोळी जातीचे असून उत्तर प्रदेशात या जातीचा समावेश अनुसूचित जातीमध्ये केला जातो.

पेशाने वकील असलेल्या कोविंद यांनी दिल्ली उच्च न्यायालयात काम केले आहे. रामनाथ कोविंद १९७७ ते १९७९ या कालावधीत दिल्ली उच्च न्यायालयात केंद्र सरकारचे वकील म्हणून कार्यरत होते. रामनाथ कोविंद यांनी १९९१ साली भाजपमध्ये प्रवेश केला. यानंतर तीनच वर्षांनी म्हणजेच १९९४ मध्ये कोविंद यांना भाजपने राज्यसभेची उमेदवारी दिली. रामनाथ कोविंद भाजपकडून दोन वेळा राज्यसभेवर निवडून गेले आहेत. १९९४ ते २००० आणि २००० ते २००६ हा कोविंद यांचा राज्यसभेतील कार्यकाळ होता.

भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी राष्ट्रपती पदासाठीचे उमेदवार जाहीर करण्यासाठी घेतलेल्या पत्रकार परिषदेत वारंवार रामनाथ कोविंद यांच्या दलित असण्याचा उल्लेख केला. पक्षाचा दलित चेहरा असलेले रामनाथ कोविंद पक्षाचे प्रवक्तेदेखील राहिले आहेत. ८ ऑगस्ट २०१५ रोजी कोविंद यांची बिहारच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली. भाजपच्या दलित मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष पदाची जबाबदारी रामनाथ कोविंद यांनी सांभाळली आहे. यासोबतच अखिल भारतीय कोळी समाजाचे अध्यक्ष म्हणून देखील त्यांनी काम केले आहे.

First Published on June 19, 2017 2:40 pm

Web Title: presidential election 2017 who is ram nath kovind ndas presidential candidate announced by bjp president amit shah