भाजपने रामनाथ कोविंद यांना राष्ट्रपतीपदाची उमेदवारी देऊन पुन्हा एकदा सर्वांना धक्का दिला आहे. लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी अशा दिग्गज नेत्यांना बाजूला सारत मोदी- शहा जोडीने कोविंद यांच्यावर विश्वास दाखवला. २०१९ मधील लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशसह देशभरातील दलित मतदार भाजपसोबत राहावा यासाठी मोदी- शहा जोडीने हा निर्णय घेतल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे.

१९९१ मध्ये भाजपमध्ये प्रवेश करणारे रामनाथ कोविंद हे सध्या बिहारचे राज्यपाल आहेत. योगी आदित्यनाथांची मुख्यमंत्रीपदी निवड करताना मोदी- शहा जोडीने ज्या धक्कातंत्राचा वापर केला तीच पद्धत राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीतही दिसून आली. भाजपकडून कोणाला उमेदवारी देणार याविषयी तर्कवितर्क लढवले जात होते. पण या नावांना बगल देत मोदी- शहा यांनी रामनाथ कोविंद यांची निवड केली.

रामनाथ कोविंद हे मूळचे उत्तर प्रदेशचे असून, त्यांचा जन्म कानपूरमध्ये झाला. कोविंद हे दलित समाजातून येतात. अमित शहा यांनी पत्रकार परिषदेमध्ये वारंवार कोविंद यांच्या दलित समाजातून येण्याचा आणि मागासवर्गीयांसाठी लढा दिल्याचा उल्लेख केला. यातून भाजपने कोविंद यांची निवड का केली हे स्पष्ट होते. या संदर्भात ‘लोकसत्ता’चे दिल्लीतील विशेष प्रतिनिधी संतोष कुलकर्णी म्हणाले, उत्तर प्रदेश आणि देशभरातील दलित मतदार हे भाजपसाठी महत्त्वाचे आहेत. २०१४ प्रमाणेच २०१९ मध्येही उत्तर प्रदेशमध्ये भाजपला घवघवीत यश मिळणे गरजेचे आहे . यासाठी भाजपला दलित मतदारांची साथ मिळण्याची आवश्यकता आहे. दलित व्होटबँक असलेल्या बसपला हादरा देण्यासाठी भाजपने कोविंद यांचा आधार घेतल्याचे दिसते. दलित मतदारांना आकर्षित करण्यासाठी भाजपने कोविंद यांची निवड केली.

विनय सहस्त्रबुद्धे यांच्याप्रमाणेत कोविंद हे भाजपचे अभ्यासू नेते म्हणून ओळखले जातात. कोविंद यांचा भाजपच्या ‘थिंक टँक’मध्ये समावेश होतो. राष्ट्रपतीपदावर मर्जीतील व्यक्तीला बसवण्याची मोदी- शहा जोडीचा प्रयत्न होता. आपले म्हणणे ऐकणारा आणि भविष्यात सरकारच्या कामात अडथळे आणणारा राष्ट्रपती नको अशी त्यांची भूमिका होती. त्यादृष्टीनेही कोविंद हे मोदी- शहांसाठी विश्वासपात्र ठरले आहेत.