राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार रामनाथ कोविंद यांनी बिहारच्या राज्यपालपदाचा राजीनामा दिला आहे. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी त्यांचा राजीनामा मंजूर केला आहे. कोविंद २३ जून रोजी सकाळी ११ वाजता राष्ट्रपतीपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. कोविंद यांच्या राजीनाम्यानंतर पश्चिम बंगालचे राज्यपाल केसरीनाथ त्रिपाठी यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे.

कोविंद २३ जूनला उमेदवारी अर्ज दाखल करतील. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष अमित शहा, चंद्राबाबू नायडू, प्रकाशसिंह बादल, तसेच अन्य भाजपचे सरकार असलेल्या राज्यांचे मुख्यमंत्री, भाजपच्या संसदीय समितीचे सदस्य, वरिष्ठ केंद्रीय मंत्री उपस्थित राहतील. तत्पूर्वी कोविंद हे मंगळवारी राजधानी दिल्लीत होते. तेथे त्यांनी केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेऊन चर्चा केली. दरम्यान, बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनीही राष्ट्रपतीपद निवडणुकीसंदर्भात पक्षाची महत्त्वाची बैठक बोलावली आहे. ते कोविंद यांना पाठिंबा देतील, अशी शक्यता सूत्रांकडून व्यक्त करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, यासंदर्भात विरोधकांनी अद्याप कोणताही निर्णय घेतला नाही. काँग्रेसच्या नेतृत्वाखालील विरोधी पक्षांची २२ जूनला बैठक होणार आहे. त्या बैठकीनंतरच निर्णय होण्याची शक्यता आहे.

एनडीएकडून लालकृष्ण अडवाणी, सुषमा स्वराज, लोकसभा सभापती सुमित्रा महाजन, केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री थावरचंद गेहलोत, झारखंडच्या राज्यपाल द्रौपदी मूरमू, ज्येष्ठ अणुसंशोधक डॉ. अनिल काकोडकर यांचे नाव चर्चेत होते. पण मोदी-शहा यांनी या सर्व शक्यता फेटाळून लावत सर्वांना धक्का दिला होता. भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेतली होती. त्यात राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराची घोषणा केली. रामनाथ कोविंद हे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार असतील, असं त्यांनी सांगितलं होतं.