‘प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया’ व्यवस्थापनाचा खुलासा

नवी दिल्ली : ‘प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया’ या वृत्तसंस्थेने नुकतेच २९७ कर्मचाऱ्यांना नोकरीतून काढले असले तरी त्यांचे कोणतेही आर्थिक नुकसान झालेले नाही, असे संस्थेच्या व्यवस्थापनाने स्पष्ट केले आहे. या कर्मचाऱ्यांना औद्योगिक तंटा कायद्यातील मार्गदर्शक तत्त्वांनुसार २८ लाखांपासून एक कोटी नऊ लाखांपर्यंत आर्थिक लाभ मिळणार आहे.

अद्ययावत तंत्रज्ञानामुळे गेल्या दोन दशकांत प्रसिद्धी माध्यमांतील अनेक विभागांतील कामांचे स्वरूप कमालीचे बदलत आहे. अनेक कामांची गरज आणि प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे संस्थेचे आर्थिक हित आणि कर्मचाऱ्यांची गरज लक्षात घेऊन विभागवार आवश्यक तितकीच कपात केली गेली आहे, असे व्यवस्थापनाने म्हटले आहे.

२९ सप्टेंबरला झालेल्या या कपातीत १४७ कर्मचारी हे सेवा मदतनीस, ८० कर्मचारी हे ‘ट्रान्समीशन विभागा’तले तर ७० अभियांत्रिकी विभागातील होते.

या सर्व कर्मचाऱ्यांना भविष्यनिर्वाह निधी आणि ‘ग्रॅच्युटी’चा लाभही दिला जाणार आहे. यातील ५८ कर्मचारी निवृत्तीच्या वाटेवर होते. त्यांना मिळालेला आर्थिक लाभ हा  त्यांच्या सेवावेतनापेक्षा कैकपटीने अधिक असल्याचा दावाही व्यवस्थापनाने केला आहे. २९७पैकी २५२ कर्मचाऱ्यांना ४० ते ६० लाख रुपयांपर्यंतचा आर्थिक लाभ मिळणार आहे.

‘प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया’ ही आर्थिक फायदा हा मुख्य हेतू ठेवून चालवली जाणारी संस्था नाही. तरीही आम्ही पत्रकारांसाठी असलेल्या मजिठिया वेतन आयोगाच्या शिफारशी २०१४मध्ये लागू केल्या. त्यामुळे वेतन पुनर्रचनेनंतर कंपनीला १०५ कोटी रुपयांची भरपाई द्यावी लागली होती. त्या भरपाईसाठी संस्थेच्या राखीव स्थायी निधीलाही हात घालावा लागला होता. गेल्या वर्षी आम्ही ३४ कोटींचा तोटाही सोसला, असे व्यवस्थापनाने नमूद केले आहे.

समर्पित कर्मचारी ही आमची ताकद असून त्यांच्याच जोरावर पत्रकारितेतील मापदंड आम्ही निर्माण केले आहेत. जगभरातील माध्यमांसमोरील आव्हाने वाढत असताना कर्मचाऱ्यांच्या  तसेच ग्राहकांच्या हितरक्षणाला आमचे प्राधान्य आहे, असेही संस्थेने नमूद केले आहे.