चीनवर दिवसेंदिवस आंतरराष्ट्रीय दबाव वाढत चालला आहे. अमेरिका, जर्मनी पाठोपाठ आता ऑस्ट्रेलियाने करोना व्हायरसच्या फैलावाची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी केली आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या सर्व सदस्य देशांनी करोना व्हायरसची स्वतंत्र चौकशी करण्याच्या प्रस्तावाचे समर्थन करावे, असे ऑस्ट्रेलियाने म्हटले आहे. इंडिया टुडेने हे वृत्त दिले आहे.

करोना व्हायरसचा विषय चीनने ज्या पद्धतीने हाताळला, त्यावरही ऑस्ट्रेलियाने अत्यंत बोचरी टीका केली आहे. करोना व्हायरस हा विषाणू नेमका काय आहे? कशा पद्धतीने त्याचा फैलाव होतोय? याची माहिती चीनने वेळीच दिली नाही असा त्यांच्यावर आरोप होत आहे. करोना व्हायरसमुळे लाखो लोक बाधित झाले असून आतापर्यंत दीडलाखापेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू झाला आहे.

आणखी वाचा- Coronavirus: हा जगातल्या सगळ्यात बलाढ्य अर्थव्यवस्थेवरील हल्ला; ट्रम्प यांचा चीनवर निशाणा

करोना व्हायरसमुळे जगाचे अर्थचक्र ठप्प झाले आहे. आजाराबरोबर जगासमोर आज गंभीर आर्थिक संकट निर्माण झाले आहे. या सर्व परिस्थितीसाठी जगातील अनेक देश आज चीनला जबाबदार ठरवत आहेत. चीनने चौकशीची मागणी याआधीच फेटाळून लावली आहे. अमेरिकेच्या नेतृत्वाखाली हा आमच्या विरोधातील प्रचाराचा भाग असल्याचे चीनने म्हटले आहे.

जर्मनीने काय म्हटलं...
जर्मनीच्या चॅन्सलर अँजेला मर्केल यांनी सोमवारी चीनकडे एक विनंती केली. करोनाच्या प्रादुर्भावासंदर्भात चीनने स्पष्टपणे माहिती द्यावी असं मार्केल यांनी म्हटलं आहे. “चीनने या विषाणूचा प्रसार कसा आणि कधी सुरु झाला याबद्दल अधिक चांगल्याप्रकारे आणि स्पष्टपणे सांगितल्यास त्याचा सर्वांना फायदा होईल असं मला वाटतं. तसेच यामधून सर्वांना धडा घेता येईल,” असं मार्केल यांनी बर्लिनमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना म्हटलं आहे.