दिल्लीतील वायू प्रदूषण रोखण्याचे आदेश

पिकांचे अवशेष जाळण्यास बंदी घालूनही तसे प्रकार सुरू असल्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी पंजाब व हरयाणा सरकारवर ताशेरे ओढले. हवा प्रदूषणामुळे दिल्लीतील लोकांना मरू देणार का, असा सवालही न्यायालयाने केला आहे. हवा, पेयजल दर्जा, कचरा विल्हेवाट या मुद्दय़ांवर पंजाब, हरयाणा, उत्तर प्रदेश व दिल्ली या राज्यांनी तसेच केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने अहवाल सादर करावा तसेच प्रदूषणकारी धुके दूर करण्यासाठी मनोरे उभारण्याचा निर्णय केंद्राने दहा दिवसात घ्यावा, असा आदेश न्यायालयाने या सर्वाना नोटीस देऊन जारी केला आहे.

राज्यांनी पिकांचे अवशेष जाळण्यास प्रतिबंध करण्याबाबतच्या आदेशांचे पालन न केल्याबाबत संताप व्यक्त करताना न्यायालयाने सांगितले की, हे असे वर्तन खपवून घ्यायचे का, अंतर्गत युद्धापेक्षा हे वाईट आहे. त्यापेक्षा सगळ्या लोकांना स्फोटकांनी मारून तरी टाका.

न्या. अरूण मिश्रा व न्या. दीपक गुप्ता यांनी सांगितले की, दिल्ली राजधानी परिसरात लाखो लोकांचे आयुर्मान कमी झाले आहे ते प्रदूषणाने गुदमरत आहेत. तुम्ही लोकांना अशीच वागणूक देणार का, प्रदूषणाने त्यांना मरू देणार का. लोक या गॅस चेंबरमध्ये गुदमरत आहेत त्यापेक्षा त्यांना मारून तरी टाका. कारण हे असे चुकीचे वर्तन असेच चालू राहणार आहे.

केंद्र व राज्य सरकारवर सर्वोच्च न्यायालयाने ताशेरे ओढताना सांगितले की, एकमेकांवर आरोप करण्याचा खेळ ते खेळत आहेत, दिल्लीतील पाणी व प्रदूषण या दोन्ही प्रश्नांवर ते एकमेकांवर आरोप करीत आहेत. दिल्लीतील प्रदूषणाच्या प्रश्नाची गंभीर दखल घेत न्यायालय म्हणाले की, लोकांना शुद्ध पेयजल मिळण्याचा अधिकार आहे. दिल्लीतील पाणी प्रदूषित आहे, हे ऐकून आम्हाला धक्का बसला. या परिस्थितीतही दिल्ली सरकार व केंद्र सरकार यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. हे काय चालले आहे?

दिल्लीत धुळीचे प्रदूषण रोखण्यासाठी पाच लाख लिटर पाण्याची फवारणी

नवी दिल्ली : दिल्लीत हवा प्रदूषणास कारण ठरणारी धूळ रोखण्यासाठी दोन दिवसात महत्त्वाच्या तेरा प्रदूषणकारी ठिकाणी पाच लाख लिटर पाणी शिंपडण्यात आले. शनिवारी धूळ खाली बसवण्यासाठी पाणी मारण्याची उपाययोजना सुरू करण्यात आली.  रोहिणी, द्वारका, ओखला फेज २, पंजाबी बाग, आनंद विहार, विवेक विहार, वझीरपूर, जहांगीरपुरी, आरके पुरम, बवाना, नरेला, मुंडका व मायापुरी ही तेरा प्रमुख ठिकाणे अशी आहेत जेथे धुळीचे प्रमाण जास्त आहे तेथे पाणी शिंपडण्यात आले. या ठिकाणांची प्रदूषणकारी म्हणून ओळख कें द्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने पटवलेली आहे. शनिवार व रविवारी अग्निशमन खात्याच्या ४०० जवानांनी पाच लाख लिटर पाणी या भागांमध्ये फवारले अशी माहिती मुख्य अग्निशमन अधिकारी अतुल गर्ग यांनी दिली आहे.  एकूण वीस अग्निशामक बंब पाणी फवारण्यासाठी वापरण्यात आले. दिल्ली सध्या भीषण प्रदूषण स्थितीतून जात आहे. ऑक्टोबरपासून तेथील हवेची प्रदूषण पातळी अतिगंभीर आहे.

दिल्लीत हवा प्रदूषणाची पातळी ‘वाईट’

नवी दिल्ली : दिल्लीची हवा प्रदूषण पातळी ही सोमवारी ‘वाईट’ प्रवर्गात होती. मात्र नंतर पावसाच्या शक्यतेने ती थोडीशी सुधारण्याची शक्यता नाकारता येत नाही. सिस्टीम ऑफ एअर क्वालिटी अँड वेदर फोरकास्टिंग अँड रीसर्च (सफर) या संस्थेने म्हटले आहे की, दिल्लीतील हवा प्रदूषण निर्देशांक हा  सकाळी ९.१० वाजता २१८ होता, तर एकूण निर्देशांक पावणेदहा वाजता २५४ होता. दिल्ली राजधानी परिसरात प्रदूषण पातळी रविवारी वाऱ्यांचा वेग थोडा वाढल्याने थोडी कमी होती. शुक्रवारी दुपारी चार वाजता प्रदूषण पातळी ३१२ होती, तर रविवारी  दुपारी ४ वाजता ती २३४ होती.  सोमवारी दिल्लीत सकाळचे तपमान १३.७ अंश होते. आद्र्रता ८७ टक्के होती. हवामान अंदाजानुसार हलक्या पावसाची शक्यता असल्याने पुढील काळात प्रदूषण कमी होऊ शकते. रविवारी कमाल तापमान २६.८ तर किमान तापमान १५.३ होते.