इराणनं बुधवारी आक्रमक पवित्रा घेत इराकमधील अमेरिकेच्या लष्करी हवाई तळांवर क्षेपणास्त्र हल्ला केला. यानंतर कच्च्या तेलाच्या किंमतीत तेजी आल्याचं पहायला मिळत आहे. इराणच्या हल्ल्यानंतर कच्च्या तेलाच्या किंमतीत ४.५ टक्क्यांची वाढ झाली. WTI च्या इंडेक्सवर कच्च्या तेलाच्या किंमतीत ४.५३ टक्क्यांची वाढ होऊन ते ६५.५७ डॉलर्स प्रति बॅरल इतके झाले आहेत. यामुळे भारतातही पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर अमेरिका आणि इराण या दोन्ही देशांमधील संबंध अधिक ताणले गेले आहेत. यामुळे कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावरही परिणाम होऊ शकतो. इराणच्या हल्ल्यानंतर कच्च्या तेलाच्या किंमतीत ३.५ टक्क्यांची वाढ दिसून आली आहे. यापूर्वी सोमवारी कच्च्या तेलाचे दर ७० डॉलर प्रति बॅरलवर गेले होते. तसंच सौदी अरामकोवरील हल्ल्यानंतरही कच्च्या तेलाच्या दरात वाढ झाल्याचं पहायला मिळालं होतं.

भारतीय वायदा बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ झाल्याचं पहायला मिळत आहे. मंगळवारी कच्च्या तेलाच्या किंमतीत ०.७७ टक्क्यांती घट होऊन ती ४ हजार ५०३ रूपये प्रति बॅरल इतकी झाली होती. इराण आणि अमेरिकेतील तणावाच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांमध्येही कच्च्या तेलाच्या किंमतीत तेजी पहायला मिळाली होती.

इराणचा क्षेपणास्त्र हल्ला
इराणनं बुधवारी आक्रमक पवित्रा घेत इराकमधील अमेरिकेच्या लष्करी हवाई तळांवर क्षेपणास्त्र हल्ला केला. इराणनं या क्षेपमास्त्र हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली असून अमेरिकेनंही या वृत्ताला दुजोरा दिला आहे. अबरिल, अल असद आणि ताजी या लष्करी हवाई तळांवर इराणकडून क्षेपणास्त्र हल्ला करण्यात आला. इराणच्या माध्यमांकडून मिळालेल्या माहितीनुसार या हल्ल्यात ३० अमेरिकेचे सैनिक मारले गेल्याचं सांगण्यात आलं आहे.