केरळ नन बलात्कार प्रकरणातील आरोपी बिशप फ्रँको मुलक्कल यांच्या विरोधात जबानी देणाऱ्या प्रिस्टचा मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. फादर कुरीयाकोसी (६०) सोमवारी सकाळी जालंधर येथील चर्चमधील त्यांच्या खोलीत मृतावस्थेत सापडले.

मृत्यूचे नेमके कारण अजून स्पष्ट झालेले नाही. पण फादर कुरीयाकोसी यांच्या कुटुंबाने काहीतरी चुकीचे घडल्याचा संशय व्यक्त केला आहे. या प्रकरणात कुरीयाकोसी यांची साक्षीदार म्हणून महत्वाची भूमिका नाहीय. पण नन बलात्कार प्रकरणात ज्या १०० जणांची चौकशी झाली त्यामध्ये फादर कुरीयाकोसी होते.

मातृभूमीला दिलेल्या मुलाखतीत फादर कुरीयाकोसी यांनी त्यांना धमकावले जात असल्याचे म्हटले होते. बिशप फ्रँको मुलक्कल यांच्या विरोधात साक्ष दिली तर आपल्या बरोबर काय होईल याची भिती वाटते असे म्हटले होते.

अलीकडेच मुलक्कल यांची जामिनावर सुटका झाली आहे. आपली सुटका हा एक चमत्कार असून पोलीस दबावाखाली काम करत आहेत असे मुलक्कल यांनी म्हटले होते. फ्रँको मुलक्कल याला केरळ हायकोर्टाने सशर्त जामीन मंजूर केला आहे. २०१४ ते २०१६ या दोन वर्षात बिशप फ्रँकोने बलात्कार केल्याचा आरोप ननने केला होता.

हायकोर्टाने फ्रँको मुलक्कलला सशर्त जामीन मंजूर केला. केरळ हायकोर्टाने मुलक्कल याला जामीन मंजूर करताना केरळमध्ये प्रवेश करु नये, तसेच न्यायालयात पासपोर्ट जमा करावा, असे आदेश दिले आहेत.

दरम्यान, फ्रँको मुलक्कलच्या कोठडीसाठी पोलिसांनी कोर्टात वैद्यकीय अहवालाचा दाखला दिला होता. यात वैद्यकीय चाचणीतून महिलेवर अत्याचार केल्याचे उघड झाल्याचे म्हटले होते. फ्रँको मुलक्कल याने अधिकाराचा गैरवापर करत ननवर बलात्काराचा केल्याचे यात म्हटले होते. तीन दिवस कसून चौकशी केल्यानंतर पोलिसांनी मुलक्कलला अटक केली होती. या आरोपानंतर फ्रँको मुलक्कलला बिशप पदावरुन मुक्त करण्यात आले होते.

 

.