कोलकाता : मुर्शिदाबाद येथील तिहेरी खून हा व्यक्तिगत आर्थिक वादातून झाला होता  त्यात राजकीय असे काहीही नव्हते, असे पोलिसांनी केलेल्या तपासात निष्पन्न झाले असून यात एकाला अटक करण्यात आली आहे.

भाजपने या प्रकरणाला राजकीय रंग दिला होता पण आता या प्रकरणाचे गूढ पोलिसांनी उकलले असून त्यात खून झालेल्या कुटुंबीयांच्या परिचयातील एका गवंडय़ास अटक करण्यात आली आहे. या खून प्रकरणात भाजप तसेच पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनकर यांनी ममता बॅनर्जी सरकारवर राजकीय हत्यांचे आरोप केले होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने सदर प्रकरणात मारली गेलेली व्यक्ती त्यांची समर्थक असल्याचे म्हटले होते पण त्यांच्या कुटुंबीयांनी मात्र त्याचा  कुठल्याही राजकीय पक्षाशी संबंध नसल्याचे स्पष्ट केले होते.

मुर्शिदाबाद जिल्ह्य़ात जियागंज येथे  शाळा शिक्षक असलेला  बंधू प्रकाश पाल (वय३५), त्याची गर्भवती पत्नी ब्युटी व आठ वर्षांचा मुलगा आंगन यांची राहत्या घरी हत्या करण्यात आली होती. या  प्रकरणात सोमवारी रात्री मुर्शिदाबाद जिल्ह्य़ात सागरदिघीतील साहापूर भागात उत्पल बेहरा याला अटक करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक मुकेश कुमार  यांनी सांगितले की, पाल व बेहरा यांच्यात आर्थिक वाद होते.