करोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी आणि बाधित रुग्णांच्या मदतीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘पंतप्रधान सहाय्यता आणि आपत्कालिन स्थिती मदत निधी’ची (पीएम-केअर्स) स्थापना केली आहे. सर्व क्षेत्रातील लोकांना या निधीमध्ये आपली मदत पाठवता येणार आहे.

पंतप्रधान या निधीबाबत माहिती देताना म्हणाले, “हा निधी स्वस्थ भारत घडवण्यासाठी मोठा मार्ग तयार करेल तसेच सर्व क्षेत्रातील लोक या निधीमध्ये दान करु शकतात. माझं सर्व भारतीयांना आवाहन आहे की, त्यांनी पीएम-केअर्स निधीत योगदान द्यावे. या निधीद्वारे यापुढे येणाऱ्या अशा प्रकारच्या संकटांचा सामना करण्यासाठी मदत होईल.”

दरम्यान, मोदींच्या या आवाहनाचा परिणामही दिसायला सुरुवात झाली आहे. भारतीय प्रशासकीय सेवा (आयएएस) असोसिएशनने करोनाशी लढण्यासाठी सुरुवातीलाच पीएम-केअर्स फंडला २१ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. त्याचबरोबर या संघटनेचे प्रत्येक सदस्य मदत म्हणून कमीत कमी एका दिवसाचे वेतन या निधीसाठी देणार आहेत, असोसिएशनने याची माहिती दिली आहे.