राम जन्मभूमी— बाबरी मशीद जमीन वादाचा निकाल सर्वोच्च न्यायालयात नोव्हेंबरमध्ये लागण्याची शक्यता असून त्यानंतर देशात कुठल्याही प्रकारे असंतोष न पसरवता शांतता पाळावी, असा अप्रत्यक्ष संदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ या कार्यक्रमात दिला.

ते म्हणाले की, सप्टेंबर २०१० मध्ये अलाहाबाद उच्च न्यायालयाने राम जन्मभूमी प्रकरणात निकाल दिला होता, त्यावेळी हितसंबंधी लोकांनी संघर्षांची भाषा करून अशांतता माजवण्याचा प्रयत्न केला. त्यात काही वाचाळांचा केवळ प्रकाशझोतात राहण्याचा संकुचित हेतू होता. त्यावेळी काही दिवस तणावाचे वातावरण राहिले. पण, जेव्हा प्रत्यक्षात निकाल आला तेव्हा संत, सामाजिक संघटना, धर्मगुरू, सर्वधर्मीय नेते यांच्या प्रयत्नातून  न्यायालयीन निकालाचा आदर करण्यात आला. त्यावेळी सर्वानी समतोल अशी वक्तव्ये केली. त्यातून सामाजिक- राजकीय तणाव कमी करण्याचा प्रयत्न करण्यात आला, तसेच न्यायव्यवस्थेचा सन्मान करीत एकता व अखंडतेची परंपरा अधिक दृढ करण्यात आली होती. त्या काळात कुठेही संतप्त भावना उमटल्या नाहीत. किंवा कुठे तणावही निर्माण झाला नव्हता.

सर्वोच्च न्यायालयात नोव्हेंबरमध्ये  अयोध्या प्रकरणी निकाल लागणार असून त्यावेळी देशात शांतता राखण्यात सामाजिक संघटना व संत, धार्मिक नेते यांनी मदत करावी, असा अप्रत्यक्ष संदेश मोदी यांनी दिला आहे.

पंतप्रधान मोदी यांनी एकता पुतळ्याच्या निमित्ताने पर्यटनाला प्रोत्साहन मिळाल्याचे सांगितले. २६ लाख पर्यटकांनी या पुतळ्याला भेट दिल्याचे त्यांनी म्हटले आहे. वर्षभराच्या काळात ते जगातील प्रसिद्ध  पर्यटन स्थळ बनले आहे. सरदार पटेल यांना श्रद्धांजली वाहताना त्यांनी सांगितले की, त्यांनी देश एकसंघ राखण्यात मोठे काम केले. ते म्हणाले की, आमचे सैनिक केवळ देशाचे रक्षण करीत आहेत असे नव्हे तर आता त्यांनी सियाचेनमध्ये स्वच्छता कार्यक्रम हाती घेतला आहे. गुरूनानक यांच्या ५५० व्या जयंतीचाही त्यांनी उल्लेख केला.

‘दिवाळी हा जागतिक उत्सव’

सणांच्या निमित्ताने पर्यटनाला उत्तेजन मिळत असते. दिवाळी हा जागतिक उत्सव आहे. आपला देश सण-समारंभांचा आहे. त्यात दिवाळी, ओणम, पोंगल, बिहू यांसारखे सण आहेत. या सणउत्सवांच्या निमित्ताने पर्यटन उद्योगाला चालना देता येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.