युपीए सरकारच्या काळात पंतप्रधान राहिलेल्या डॉ. मनमोहन सिंग यांच्याविषयी नियोजन आयोगाचे माजी उपाध्यक्ष मोंटेक सिंग अहलुवालिया यांनी धक्कादायक खुलासा केला आहे. “२०१३मध्ये तत्कालिन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखाली सरकारनं एक विधेयक आणलं होतं. हे प्रस्तावित विधेयक काँग्रेसचे नेते राहुल गांधी पत्रकार परिषदेत फाडून टाकलं होतं. त्यांच्या या कृतीनंतर मनमोहन सिंग हे राजीनामा देणार होते,” असा गौप्यस्फोट अहलुवालिया यांनी केला आहे.

नियोजन आयोगाचे माजी उपाध्यक्ष यांनी लिहिलेलं ‘बॅकस्टेज : द स्टोरी बिहाइंड इंडियाज हाई ग्रोथ ईअर्स’ हे पुस्तक रविवारी प्रकाशित झालं. या पुस्तकात युपीए सरकारच्या काळातील माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्याविषयीच्या घटनेबद्दल अहलुवालिया यांनी लिहिलं आहे.

“डॉ. मनमोहन सिंग सरकारच्या काळात प्रस्तावित असलेल्या एका विधेयकावर नाराजी व्यक्त करत राहुल गांधी यांनी त्या विधेयकाची प्रत पत्रकार परिषदेतच फाडून टाकली. गुन्ह्यात दोषी खासदारांविषयी सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निर्देशानुसारच हे विधेयक तयार करण्यात आलं होतं. मात्र, राहुल गांधी यांनी त्याला विरोध केला होता. यावरून डॉ. मनमोहन सिंग राजीनामा देणार असल्याच्या चर्चाही सुरू झाल्या होत्या. दरम्यान, २०१३मध्ये घडलेल्या या घटनेविषयी नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष मोंटेकसिंग अहलुवालिया यांनी आपल्या पुस्तकात लिहिलं आहे.

अहलुवालिया यांनी काय सांगितलं?

“मी त्यावेळी न्यूयॉर्कमध्ये पंतप्रधानांसोबत गेलेल्या शिष्टमंडळात होतो. त्यावेळी माझा भाऊ जो आयएएस पदावरून निवृत्त झाला आहे. त्याने मला सांगितलं की, ‘एक लेख लिहिला आहे जो पंतप्रधानांसाठी महत्त्वाचा आहे.’ त्याने तो लेख मेल केला. त्याचबरोबर ‘हा लेख वाईट तर नाही ना?’ अशी विचारणाही केली. हा लेख घेऊन मी पंतप्रधानांकडे (मनमोहन सिगं) गेलो. त्यांनी सगळ्यात आधी माझं ऐकावं अशी माझी इच्छा होती. त्यांनी तो लेख शांततेनं वाचला, पण कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. त्यानंतर अचानक मनमोहन सिंग यांनी विचारलं की, मी राजीनामा द्यायला हवा का?, अशी विचारणा केली. त्यावर या मुद्यावर राजीनामा देणं उपयोगी नाही, असं मी त्यांना सांगितलं,” असं अहलुवालिया यांनी पुस्तकात म्हटलं आहे.