तुमच्या संख्येपेक्षा तुमचा प्रत्येक शब्द मौल्यवान असल्याने तुम्ही संसदेत सक्रियपणे प्रश्न मांडा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी विरोधी पक्षांना केले.

लोकसभा निवडणुकीनंतर संसदेच्या  पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी पंतप्रधान मोदी यांनी सर्व खासदारांना सभागृहात निष्पक्षपणे राहण्याचे आणि व्यापक देशहिताचे प्रश्न मांडण्याचे आवाहन संसदेबाहेर माध्यमांशी बोलताना केले.  लोकशाहीत सक्रिय विरोधी पक्षाचे महत्त्व अधोरेखित करून मोदी म्हणाले, विरोधी पक्ष संसदेत सक्रियपणे प्रश्न मांडतील आणि कामकाजातही सहभागी होतील, अशी अपेक्षा आहे. अधिवेशन जास्तीतजास्त यशस्वी होईल, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.

विरोधकांनी संसदेतील त्यांच्या संख्याबळाची काळजी करण्याची गरज नाही. लोकांनी विरोधी पक्षांचे कितीही खासदार निवडून दिले असले तरी त्यांचा प्रत्येक शब्द, त्यांच्या भावना मौल्यवान आहेत, असे मोदी यांनी १७व्या लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनापूर्वी सांगितले. दरम्यान, पंतप्रधानांच्या आवाहनावर प्रतिक्रिया व्यक्त करताना, संसदेत चर्चेशिवाय महत्त्वाची विधेयके बहुमताच्या बळावर पुढे रेटण्याचा भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारचा प्रयत्न असल्याची टीका काँग्रेसने केली.

आपण संसदेत येतो तेव्हा आपण सत्ताधारी आणि विरोधी पक्ष आहोत, हे विसरले पाहिजे आणि देशाच्या व्यापक हितासाठी निष्पक्षपणे चिंतन केले पाहिजे.

– नरेंद्र मोदी, पंतप्रधान