पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ‘मन की बात’द्वारे संपूर्ण देशाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी देशभरातील शेतकऱ्यांना नमन केले. करोना संकट काळात देशातील शेतकऱ्यांनी आपले सामर्थ्य सिद्ध केले असल्याचे मोदींनी सांगितले.

मोदी म्हणाले, शेतकऱ्यांच्या कष्टांमुळेच आपल्या सण-उत्सवांमध्ये रंग भरले जातात. आपल्या अन्नदात्यास शेतकऱ्यांच्या या शक्तीस वेदांमध्ये देखील नमन करण्यात आले आहे. ऋगवेदामध्ये मंत्र आहे, “अन्नानां पतये नम:.. क्षेत्राणाम पतये नम:.” म्हणजेच अन्नदात्यास नमन आहे, शेतकऱ्यास नमन आहे.

आपल्या शेतकरी बांधवांनी करोनाच्या या कठीण परिस्थितीतही आपले सामर्थ्य सिद्ध केले आहे. आपल्या देशात यंदा खरीप पिकांची लागवड मागील वर्षीपेक्षा सात टक्के जास्त झाली. दाळी जवळपास पाच टक्के व कापसाची लागवड जवळपास तीन टक्के जास्त लागवड झाली आहे. मी यासाठी देशातील शेतकऱ्यांचे अभिनंदन करतो, त्यांच्या कष्टांना नमन करतो.