देशातील ‘स्वच्छ भारत’ अभियानाप्रमाणे  तरुणाईने काळ्यापैशाच्या सफाईमध्ये देखील सरकारची साथ द्यावी, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तरुणाईला केले आहे. ‘ग्लोबल सिटिझन’ या संस्थेसोबत सुरेल प्रवास करणारा ‘कोल्डप्ले’ हा बँडच्या पहिला कार्यक्रम मुंबईत शनिवारी  सादर होत आहे. या कार्यक्रमाच्या पार्शभूमीवर  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कार्यक्रमासाठी जमलेल्या तरुणाईशी संवाद साधला. दोन वर्षाच्या काळात सरकारने सुरु केलेल्या  ‘स्वच्छ भारत’ अभियानाला साथ दिली तशीच साथ तरुणाईने  काळ्या पैशाच्या सफाईच्या मोहीमेत देखील द्यावी, असे मोदी यावेळी म्हणाले.

दोनवर्षापूर्वी  न्यूयॉर्कच्या सेंट्रल पार्कमध्ये ग्लोबल सिटीझन फेस्टिव्हलचा सुंदर सोहळा अनुभवला होता, त्या आठवणी जाग्या झाल्या. तुमच्यापैकी अनेक तरूण माझ्याशी मोबाइल अॅपद्वारे जोडले गेले आहेत. असे सांगत  तरुण वर्गाकडून मला शक्ती मिळते’ असेही मोदींनी म्हटले.

जगाला वेड लावणाऱ्या या बँडने मुंबईच्या पाश्चात्य संगीतप्रेमींमध्येही उत्साहाची लाट उसळली असली तरी मुंबईसह देशभरातील नागरिक चलनसंकटाने ग्रासून बँकांबाहेर रांगा लावत असतानाच अनेक पक्षांनी या कार्यक्रमाविरोधात सूर उमटविला आहे.