नोटाबंदीचा निर्णय घेतल्यानंतर विरोधी पक्षाच्या टीकेचा केंद्रबिंदू ठरलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी नववर्षाच्या पूर्वसंध्येला (दि. ३१) देशाला संबोधित करणार आहेत. ८ नोव्हेंबर रोजी नोटाबंदीचा निर्णय जाहीर केल्यानंतर त्यांनी जुन्या ५०० व १ हजार रूपयांच्या नोटा ३० डिसेंबरपर्यंत बँकेत भरता येतील असे जाहीर केले होते. उद्या (शक्रवार) जुन्या नोटा बँकेत भरण्याचा अखेरचा दिवस आहे. त्याचबरोबर चलन तुटवड्याचा प्रश्नही म्हणावा तसा निवळलेला नाही. अजूनही काही प्रमाणात बँका व एटीएमसमोर ग्राहकांच्या रांगा दिसून येतात. त्यामुळे पंतप्रधान मोदी आणखी नवा निर्णय घेतील काय याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दि. ८ नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अचानक देशाला संबोधित करत नोटाबंदीचा निर्णय जाहीर केला होता. त्यांच्या या निर्णयानंतर देशात एकच खळबळ उडाली होती. आपल्या जुन्या नोटा बँकेत जमा करण्यासाठी लोकांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. रांगांमध्ये उभे असलेल्या काही जणांना जीव ही गमवावा लागला होता. कामाच्या अतिताणामुळे बँक कर्मचारीही दगावले होते. विरोधी पक्षांनी सरकारला व पंतप्रधान मोदींना चांगलेच धारेवर धरले आहे. सरकारने देशातील नागरिकांना कॅशलेस अर्थव्यवस्थेचा पर्याय स्वीकारण्याचे आवाहन केले आहे. अजूनही नागरिकांना चलनतुटवड्याच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे.

दरम्यानच्या काळात सरकारने अनेक नियम लागू केले. काही वेळा लागू केलेले नियम मागेही घेतले. पंतप्रधान मोदींनी या काळात जिथे-जिथे लोकांसमोर बोलण्याची संधी मिळाली. तिथे नोटाबंदीच्या निर्णयाचे जोरदार समर्थन करत लोकांना हा काळा पैसा व भ्रष्टाचारविरूद्ध सुरू केलेला महायज्ञ असल्याचे म्हटले होते. परंतु विरोधी पक्षाने या निर्णयामुळे भ्रष्टाचार मिटला तर नाहीच पण सामान्य जनता होरपळल्याची टीका केली होती.

पंतप्रधान मोदींनी दिलेली ५० दिवसांची मुदत संपलेली आहे. दि. ३० डिसेंबर हा बँकांत नोटा बदलण्याचा अखेरचा दिवस आहे. पंतप्रधान मोदींनी ५० दिवसांनंतर परिस्थिती हळूहळू सुधारेल असे म्हटले होते. परंतु अजूनही ही परिस्थिती म्हणावी तशी सुधारलेली नाही. त्यामुळे नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला पंतप्रधान मोदी आणखी नवीन कोणती घोषणा करतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.