पाकिस्तानच्या ताब्यात असलेले भारतीय हवाई दलाचे पायलट विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांची उद्या सुटका होणार असल्याची खबर येताच. मोदींनी आपल्या भाषणाची सुरुवात रंजक पद्धतीने केली. व्यासपीठावरील मान्यवर वैज्ञानिकांची नावे घेताना ते म्हणाले, आपण कायमच प्रयोगशाळेत जीवन व्यतीत करणारे लोक आहात. एखादे संशोधन करताना सुरुवातीला तुम्हाला एखाद्या पायलट प्रोजेक्टवर काम करण्याची सवय असते. असाच एक ‘पायलट’ प्रोजेक्ट आम्हीही यशस्वी केला आहे.

नवी दिल्लीतील विज्ञान भवनात सुरु असलेल्या शांतीस्वरुप भटनागर पुरस्काराच्या कार्यक्रमात मोदी बोलत होते. यावेळी त्यांनी सुरुवातीला उपस्थितांना विज्ञान दिनाच्या दिल्या शुभेच्छा दिल्या. यावेळी सर्व पुरस्कार विजेत्या संशोधकांचे उपस्थितांनी उभे राहून टाळ्यांचा कडकडाट अभिनंदन केले.

हवाई दलाचे पायलट विंग कमांडर अभिनंदन यांच्या सुटकेबाबत भाष्य करताना मोदी म्हणाले, आता केवळ प्रॅक्टिस होती खरं काम तर नंतर करु. या विधानाद्वारे मोदींनी भारत आता पाकिस्तानच्या कुरापतींना बिल्कूल थारा देणार नसल्याचे सुतोवाच केले.

मोदी पुढे म्हणाले, जय जवान, जय किसान आणि जय विज्ञान ही घोषणा नव्या भारताचा मार्ग व्हावी त्यासाठी अशा पुरस्कारांची गरज आहे. मी स्वतः विज्ञानाला लोकांच्या गरजांशी जोडण्याला आग्रही असतो. आमचे सरकार त्या दृष्टीने कायम प्रयत्नशील आहे. विज्ञान-तंत्रज्ञानाला लोकांच्या गरजांशी जोडायला हवे त्यामुळे तरुणांना संशोधनासाठी प्रेरणा मिळेल.