पंतप्रधान नरेंद्र मोदींना सेऊल शांतता पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. दक्षिण कोरियाच्या कल्चरल फाऊंडेशनतर्फे हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. ऑक्टोबर महिन्यात हा पुरस्कार जाहीर करण्यात आला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या दक्षिण दौऱ्यावर आहेत. आज हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला. मोदीनॉमिक्स आणि लोकशाहीला बळकटी दिल्याने हा पुरस्कार देण्यात आला आहे.

नरेंद्र मोदींनी पुरस्कारासोबत १ कोटी ३० लाखांची रक्कम देण्यात आली आहे. पुरस्काराची रक्कम नमामि गंगा योजनेला देणार असल्याचं नरेंद्र मोदींनी सांगितलं आहे. गरीब आणि श्रीमंतांमधील दरी कमी करण्यासाठी नरेंद्र मोदींनी केलेले प्रयत्न, नोटाबंदी, वैश्विक शांततेसाठी केलेल्या कार्यासाठी नरेंद्र मोदींना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला होता.

पुरस्कार मिळाल्यानंतर मोदींनी आपलं मनोगत व्यक्त केलं. यावेळी त्यांनी सांगितलं की, ‘हा पुरस्कार माझा वैयक्तिक नसून सर्व भारतीयांचा आहे. गेल्या पाच वर्षात भारताने जे यश मिळवलं आहे त्याचा सन्मान आहे. महात्मा गांधी यांची 150 वी जयंती साजरी झाली त्याच वर्षी हा पुरस्कार मिळणं माझं भाग्य आहे’.

यावेळी नरेंद्र मोदींनी दहशतवादावरही भाष्य केलं. ‘सेऊल ऑलिम्पिकच्या काही आठवडे आधी अल कायदा नावाची संघटना उदयास आली. आज दहशतवाद आणि धर्मांध शक्तींचा वाढता प्रभाव जगासाठी धोका ठरत आहे. शांतता आणि सुरक्षेला आज मोठा धोका निर्माण झाला आहे. दहशतवाद मिटवण्यासाठी आज सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे. द्वेष नष्ट करत शांतता नांदावी यासाठी हाच एकमेव मार्ग आहे’, असं नरेंद्र मोदींनी यावेळी सांगितलं.