पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज त्यांच्या ६९ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने गुजरातमधील केवडिया येथे जनसभेला संबोधित केले. पंतप्रधान मोदी यांच्या भाषणाचा संपूर्ण रोख सरदार सरोवर धरण आणि स्टॅच्यु ऑफ युनिटीमुळे झालेल्या विकासाचे महत्व विषद करण्याकडे होता. पर्यावरणाचे रक्षण करुन विकास साधण्यावर आपल्या संस्कृतीचा विश्वास आहे आणि ही गोष्ट इथे दिसते असे मोदी म्हणाले. पाकिस्तानकडून सातत्याने युद्धाचे इशारे दिले जात आहेत पण मोदींनी आपल्या संपूर्ण भाषणात पाकिस्तानचा उल्लेख केला नाही तसेच काँग्रेसवर टीका करण्याचेही टाळले.

गेल्या ११ महिन्यात २३ लाखापेक्षा जास्त पर्यटक स्टॅच्यु ऑफ युनिटी पाहण्यासाठी आले. दरदिवशी ८५०० पर्यटक स्टॅच्यु ऑफ युनिटीला भेट देण्यासाठी येतात. स्टॅच्यु ऑफ युनिटीमधून मोठया प्रमाणावर रोजगार निर्मिती होत आहे असे मोदी म्हणाले. गेल्या शंभर दिवसात आपल्या सरकारने अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले. आपले सरकार यापूर्वीपेक्षा अधिक गतीने काम करेल असा शब्द त्यांनी दिला.

देशातील प्रत्येक घरापर्यंत पाणी पोहोचवण्याचे लक्ष्य आहे. गुजरातमधील ७८ टक्के घरांमध्ये येते नळाचे पाणी येते. २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे लक्ष्य असल्याचा त्यांनी पुनरुच्चार केला. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी अनेक पावले उचलण्यात आल्याचे ते म्हणाले. मुंबई ते हाजिरा जलमार्गावर विचार सुरु असल्याचे मोदी म्हणाले. प्लास्टिक मुक्तीसाठी आपण सर्व कटिबद्ध असले पाहिजे असे त्यांनी सांगितले.

पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणात हैदराबाद मुक्ती संग्रामाचा उल्लेख केला. आजच्याच दिवशी हैदराबादचा विलय भारतामध्ये झाला होता. सरदार पटेलांच्या दूरदृष्टीमुळे हे शक्य झाले. सरदार पटेलांकडे हे काम नसते तर आज अनेक समस्या असत्या असे मोदी म्हणाले. जम्मू-काश्मीर, लडाख, कारगिलमधल्या जनतेला भेदभावाचा सामना करावा लागत होता असे कलम ३७० रद्द करण्याच्या निर्णयावर मोदी म्हणाले.