पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. शुभेच्छा देण्यासाठी नरेंद्र मोदी यांनी नवाज शरीफ यांना फोन केला होता. यावेळी त्यांनी शरीफ यांच्या प्रकृतीचीही विचारपूस केली. काही दिवसांपूर्वीच लंडनमध्ये शरीफ यांच्यावर ओपन हार्ट सर्जरी करण्यात आली होती. सध्या सोशल मिडीयावर मोदींनी शरीफ यांना दिलेल्या शुभेच्छांची चांगलीच चर्चा रंगली आहे. नेटिझन्सकडून याबद्दल विविध प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. यापूर्वीही मोदींनी त्यांच्या पंतप्रधानपदाच्या शपथविधीला शरीफ यांना आमंत्रित केले होते. याशिवाय, डिसेंबर २०१५ मध्ये अमेरिका दौऱ्यावरून परतत असताना अचानकपणे पाकिस्तानमध्ये जाऊन शरीफ यांची भेट घेतली होती. आंतरराष्ट्रीय पातळीवर मोदींच्या या धाडसी भेटीची चांगलीच चर्चा रंगली होती.मोदी यांनी रशिया आणि अफगाणिस्तानचा दौरा करून परत येताना वाटेत पाकिस्तानमध्ये अचानक थांबून सर्वानाच आश्चर्याचा धक्का दिला होता. अफगाणिस्तानहून भारतात परत येताना ते २५ डिसेंबर २०१५ रोजी कोणालाही पूर्वसूचना न देता लाहोर येथे विमानाने पोहोचले. त्यांच्या या कृतीचे जागतिक राजकारणात आश्चर्यमिश्रित कौतुक झाले. मात्र पाकिस्तानी लष्कराला ही बाब पसंत पडली नव्हती.