पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग हे दोघेही जबाबदार नेते आहेत, दोन्ही देशांमधील प्रश्न सोडविण्याची त्यांच्यात क्षमता आहे, त्यामुळे बाह्य प्रादेशिक शक्तींनी या प्रक्रियेमध्ये हस्तक्षेप न करणे हे महत्त्वाचे आहे, असे मत रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी शनिवारी व्यक्त केले.

भारत, अमेरिका, जपान आणि ऑस्टे्रलिया या चार देशांच्या क्वाड गटावर रशिया जाहीरपणे टीका करीत आली आहे. एखाद्या देशाने अन्य देशांशी कितपत संबंध ठेवावे याच्याशी रशियाचा संबंध नाही, मात्र कोणाच्या तरी विरोधासाठी एखाद्याशी मैत्री करणे हा उद्देश नसावा, असेही पुतिन यांनी म्हटले आहे.

क्वाड गटाबाबत आणि त्यामधील भारताच्या सहभागाबद्दल रशियाचे काय मत आहे, त्याबाबत प्रश्न विचारला असता पुतिन यांनी वरील मत व्यक्त केले. इंडो-पॅसिफिक क्षेत्रात चीनचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी हा गट निर्माण करण्यात आल्याचा दावा चीनने केला त्या संदर्भाने पुतिन यांनी मत व्यक्त केले. रशियाची भारतासमवेत असलेली भागिदारी आणि रशिया आणि चीन यांच्यातील संबंध यामध्ये कोणतीह विसंगती नाही, असेही पुतिन म्हणाले.

भारत आणि चीन यांच्यात काही प्रश्न असल्याची आपल्याला जाणीव आहे, परंतु मोदी आणि जिर्नंपग या दोघांच्याही दृष्टिकोनाची आपल्याला कल्पना आहे, ते दोघेही जबाबदार नेते आहेत, ते एकमेकांचा आदर करतात, दोन्ही देशांमधील प्रश्न ते सोडवतील, मात्र त्यामध्ये बाह्य शक्तींनी हस्तक्षेप न करणे महत्त्वाचे आहे, असेही पुतिन म्हणाले.