भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार अजित वाडेकर यांचे आज (दि.१५) दीर्घ आजाराने मुंबईत निधन झाले. यानंतर देशातील अनेक मान्यवरांनी त्यांना ट्विटरवरुन श्रद्धांजली वाहिली. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही वाडेकर यांच्या जाण्याने दुःख व्यक्त केले आहे.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद आपल्या शोकसंदेशात म्हणतात की, अजित वाडेकर यांच्या जाण्याने आपल्याला दुःख झाले आहे. १९७१मध्ये भारताबाहेर खेळल्या गेलेल्या कॅरेबिअन आणि इंग्लंड दौऱ्यातील विजयाचे शिल्पकार ठरलेले वाडेकर हे भारतीय क्रिकेटमधील एक उत्कृष्ट डावखुरे फलंदाज आणि कर्णधार होते. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात मी सहभागी आहे.


पंतप्रधान मोदी यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले की, अजित वाडेकर हे भारतीय क्रिकेटमधील आपल्या मोठ्या योगदानासाठी कायम ओळखले जातील. वाडेकर हे महान फलंदाज आणि उत्कृष्ट कर्णधार होते. क्रिकेटच्या इतिहासात त्यांनी आपल्या संघाला अनेक अविस्मरणीय विजय मिळवून दिले आहेत. त्याचबरोबर ते एक प्रभावशाली क्रिकेट प्रशासकही होते. त्यांच्या निधनामुळे मला आतीव दुःख झाले आहे.