पंतप्रधान नरेंद्र मोदी निवडणुकांच्या तोंडावर आश्वासने देतात. त्यानंतर निवडणुका झाल्या की आश्वासने विसरुन जातात. ज्या ठिकाणी प्रचाराला जातील तिथे काही ना काही चुकीची आश्वासने देतातच असे म्हणत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी त्रिपुरा येथील सभेतून नरेंद्र मोदींवर टीका केली आहे.

त्रिपुरा येथील प्रचारासाठी आज शेवटचा दिवस आहे. या शेवटच्या दिवशीही काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरच निशाणा साधला. १८ फेब्रुवारीला त्रिपुरामध्ये ६० जागांसाठी मतदान होणार आहे. तर या निवडणुकीत काय झाले याचा निकाल ३ मार्चला लागणार आहे. काँग्रेसने ५६ जागांवर त्यांचे उमेदवार उभे केले आहेत. आज प्रचाराच्या शेवटच्या दिवशीही राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना आश्वासनांचा सोयीस्कर विसर पडतो असे म्हणत टीका केली आहे.

त्रिपुरा विधानसभा निवडणूक ही काँग्रेससाठी महत्त्वाची ठरणार आहे. गुजरात विधानसभा निवडणूक आणि राजस्थान पोटनिवडणूक यामध्ये काँग्रेसने भाजपला टक्कर दिली. आता त्रिपुरात काय होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. भाजपा, काँग्रेस आणि माकपा अशी तिरंगी लढत या निवडणुकीत बघायला मिळणार आहे.

त्रिपुरात सत्ता मिळण्यासाठी भाजपने सगळी ताकद पणाला लावली आहे. ‘मोदी मॅजिक’ चालणार का हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोनवेळा त्रिपुराचा दौरा केला. या दौऱ्यांदरम्यान त्यांनी भाजपाला निवडून देण्याचे आवाहन केले आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी फक्त निवडणुका जिंकण्यासाठीच आश्वासने देतात नंतर त्यांना या आश्वासनांचा सोयीस्कर विसर पडतो अशी टीका राहुल गांधी यांनी केली आहे.