देशात गोरक्षणाच्या नावाखाली सुरू असलेल्या हिंसेच्या घटनांवर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. गोरक्षणाच्या नावाखाली हत्या करणाऱ्यांविरोधात त्यांनी संताप व्यक्त केला. अशा लोकांनी गोसेवा काय असते, याची शिकवण विनोबा भावे आणि महात्मा गांधी यांच्याकडून घ्यावी, असंही मोदींनी सांगितलं. त्याचवेळी त्यांनी आपल्या बालपणी गायीशी संबंधित घडलेली घटना सांगितली. गायीच्या पायाखाली सापडून एका मुलाचा मृत्यू झाला होता. या दुःखात त्या गायीनं अन्न-पाणी सोडलं आणि पीडित मुलाच्या घरासमोरच तिनं आपले प्राण सोडले. ही घटना कथन करताना नरेंद्र मोदी भावूक झाले होते. पश्चातापाने गाय आपले प्राण सोडते तर तिच्या नावाखाली हिंसा होत असेल तर तिला किती यातना होत असतील, अशा शब्दांत त्यांनी कथित गोरक्षकांना सुनावलं. कुणालाही कायदा हातात घेण्याचा अधिकार नाही, असंही त्यांनी ठणकावलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या लहानपणी गायीशी संबंधित घडलेली घटना सांगितली. ‘मला माझ्या बालपणीची एक घटना आठवतेय. ही सत्य घटना आहे. आज पहिल्यांदाच या घटनेबाबत बोलत आहे. माझ्या गावातील घरासमोरच एक दाम्पत्य राहत होतं. लग्नाला अनेक वर्षे झाली. तरीही त्यांना अपत्यप्राप्ती झाली नाही. मूल होत नसल्यानं त्यांच्या घरात सतत तणाव असायचा. अखेर अनेक वर्षांनी त्यांना मुलगा झाला. आमच्या घरासमोर एक छोटीशी गल्ली होती. तेथील लोक सकाळी सकाळी एका गायीला पोळी खायला घालायचे. त्यामुळे ती गाय रोज सकाळी त्या गल्लीतून यायची. एक दिवस ती गाय गल्लीतून जाताना कुठेतरी फटाके फोडल्याचा आवाज आला. त्यामुळे भीतीनं गाय सैरावैरा धावू लागली. गल्लीत गोंधळ उडाला. सगळेच धावू लागले. तो तीन-चार वर्षांचा मुलगाही धावू लागला. दुर्दैव म्हणजे तो मुलगा गायीच्या पायाखाली सापडला. त्यात जखमी होऊन त्या मुलाचा मृत्यू झाला. घटनेच्या दुसऱ्या दिवशी तीच गाय त्या मुलाच्या घरासमोर आली. कुणाच्याही घरी गेली नाही. लोकांनी दिलेली पोळीही खाल्ली नाही. एक…दोन…पाच-सहा दिवस झाले गायीनं काही खाल्लं नाही. पाणीही प्यायली नाही. अनेक दिवस तिनं काहीच खाल्लं नाही. पश्चातापात ती सतत रडत होती. तिच्या डोळ्यांतून अश्रू येत होते. त्या मुलाच्या मृत्यूला आपण कारणीभूत असल्याचे दुःख त्या गायीला होतं. त्यामुळं तिनं अन्न-पाणी सोडलं होतं. अखेर त्या गायीनं प्राण सोडले.’ ही घटना सांगताना पंतप्रधान नरेंद्र मोदी काहीसे भावूकही झाले.