पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जागतिक हवामान परिषदेत घोषणा; जनचळवळीचे आवाहन

संयुक्त राष्ट्रे : हवामान बदलाचा प्रश्न हाताळण्यासाठी वर्तणुकीतील बदल घडवून आणण्याकरिता ‘जागतिक जनचळवळ’ सुरू करण्यासाठी रणशिंग फुंकावे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी केले. भारतातील जीवाश्मविरहित इंधनाचे (नॉन- फॉसिल फ्युएल) लक्ष्य दुपटीहून अधिक वाढवून ४५० गिगाव्ॉट करण्याची प्रतिज्ञाही त्यांनी केली.

पॅरिस हवामान बदल कराराबाबत असलेल्या बांधिलकीचा भाग म्हणून भारत १७५ गिगाव्ॉट जीवाश्मविरहित इंधनाचे उत्पादन करेल, असे मोदी यांनी स्वातंत्र्यदिनी केलेल्या भाषणात सांगितले होते.

मोदी यांनी सोमवारी जागतिक हवामान परिषदेत केलेली घोषणा १७५ गिगाव्ॉटच्या निर्धाराची पातळी ओलांडणारी आहे. ह्य़ूस्टन येथे रविवारी झालेल्या एका भव्य कार्यक्रमात मोदी व अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घनिष्ठ मैत्रीचे प्रदर्शन केल्यानंतर, तसेच दहशतवादाशी लढण्याबाबत समान दृष्टिकोन प्रदर्शित केल्यानंतर एका दिवसाने मोदी यांनी ही घोषणा केली आहे.

मात्र अमेरिका व भारत यांच्यात हवामान बदलाबाबत मतभिन्नता आहे. ट्रम्प यांनी २०१७ साली पॅरिस हवामान करारातून माघार घेतली होती आणि त्यांच्या निर्णयाचा दोष भारत व चीन यांना दिला होता. या करारामुळे या दोन देशांचा सर्वाधिक फायदा होणार असून, त्याची किंमत अमेरिकेला मोजावी लागणार असल्यामुळे तो अन्याय्य असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले होते.

हवामान बदलाच्या समस्येशी लढण्याकरिता निरनिराळे देश प्रयत्न करत आहेत आणि शिक्षणापासून मूल्यापर्यंत, तसेच जीवनशैलीपासून विकासाच्या तत्त्वज्ञानापर्यंत सर्व पैलूंचा विचार करणारा सर्वसमावेशक दृष्टिकोन स्वीकारण्याची गरज आहे, असे संयुक्त राष्ट्रांतील पहिल्या भाषणात मोदी यांनी नमूद केले.

ग्रेटाच्या संतप्त भावना

परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी किशोरवयीन पर्यावरणवादी ग्रेटा थम्बर्ग हिने आतापर्यंत झालेल्या पर्यावरणाच्या हानीबद्दल तीव्र संताप आणि नाराजी व्यक्त केली. हे हानीकारक बदल रोखण्यासाठी जागतिक नेत्यांनी योग्य ते प्रयत्न केले नाहीत, अशी तक्रार तिने केली. याचे परिणाम आपल्या पिढीला भोगावे लागत आहेत, असे तिने सुनावले.

ट्रम्प यांची हजेरी

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी संयुक्त राष्ट्र हवामानविषयक कृती परिषदेच्या बैठकीला काही वेळ हजेरी लावली आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हवामान बदलावरील भाषण ऐकले. या परिषदेत उपस्थितीचा ट्रम्प यांचा निर्धारित कार्यक्रम नव्हता. तरीही दुसऱ्या कार्यक्रमासाठी जाण्यापूर्वी त्यांनी सुमारे १० मिनिटे मोदींचे भाषण ऐकले. हवामान परिषद ही संयुक्त राष्ट्र आमसभेचा भाग असून, सर्व राष्ट्रांच्या सामूहिक महत्त्वाकांक्षेच्या वाटचालीबाबत चर्चा करण्यासाठी तिचे आयोजन करण्यात आले आहे.