पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मन की बात कार्यक्रमातील भाषणात खेळणी बाजाराच्या संभाव्य क्षमतेबद्दल आपले मत मांडले होते. देशी खेळण्यांना प्रोत्साहन देण्यासाठी उपलब्ध असणाऱ्या संधी यावरही त्यांनी प्रकाश टाकला होता. यातूनच खेळण्यांच्या जत्रेची कल्पना उदयास आली.

पंतप्रधान मोदींनी शनिवारी खेळण्यांच्या जत्रेचे दुरचित्रप्रणालीद्वारे उद्घाटन केले. याप्रसंगी त्यांनी देशाला खेळणी उत्पादनात आत्मनिर्भर बनवण्याचे अवाहन केले.

देशात पहिल्यांदाच होणाऱ्या खेळण्यांच्या जत्रेच्या उद्घाटन प्रसंगी पंतप्रधान म्हणाले की भारतीय खेळणी भारतीय जीवनशैलीचा एक भाग असलेल्या ‘रीयूज, रीसायकल’ संस्कृतीचा अवलंब करतात तसेच  त्यांनी उत्पादकांना कमी प्लास्टिक व जास्त पुर्नवापरात येण्याजोगे साहित्य वापरायला सांगितले.

आभासी कार्यक्रमादरम्यान मोदींनी देशभरातील अनेक टॉय क्लस्टरशी संवाद साधला. २०० वर्षांपासून खेळणी बनवणाऱ्या कर्नाटकातील खेळण्यांचे क्लस्टर चन्नपटना येथे बोलताना मोदींनी भारताच्या खेळणी उद्योगासाठी खेळणी तयार करण्यासाठी नाविन्यपूर्ण कल्पना घेऊन येण्याचे आवाहन केले.मोदी म्हणाले, ही खेळण्यांची जत्रा या क्षेत्रातील भागधारकांना एकत्र आणेल, ज्यामुळे उद्योग वाढीच्या प्रयत्नात आणखी भर पडेल.