पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन

भारत आणि बांगलादेश यांना जगात स्थैर्य, प्रेम आणि शांतता हवी आहे; अस्थिरता, दहशतवाद आणि अस्वस्थता नको आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी केले. पंतप्रधान मोदी मतुआ समुदायाच्या सदस्यांपुढे बोलत होते.

पंतप्रधान मोदी बांगलादेशच्या दौऱ्यावर होते. त्यांनी शनिवारी दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी गोपालगंज ओराकांडी येथील मंदिरात जाऊन प्रार्थना केली. मतुआ समुदायाचे आध्यात्मिक गुरू हरिचंद ठाकूर यांच्या जन्मस्थानी हे मंदिर आहे. भारत आणि बांगलादेश या दोन्ही देशांना स्वत:च्या विकासाबरोबरच जगाची प्रगती हवी आहे. दोन्ही देशांना जगात शांतता, स्थैर्य, प्रेम हवे आहे, तर अस्थिरता, दहशतवाद आणि अस्वस्थतेवर मात करायची आहे, असे मोदी म्हणाले.

आपण २०१५ मध्ये बांगलादेशला भेट दिली होती, तेव्हाच ओराकांडी येथे भेट देण्याची इच्छा होती, पण काही कारणास्तव ते जमले नाही. या वेळी तेथील मंदिरास भेट देऊन प्रार्थना करण्याची आपण वाटच बघत होतो, असे मोदी म्हणाले. भारतीय मटुआ समुदायाच्या मनात ओराकांडीत आल्यानंतर ज्या भावना आहेत, त्या माझ्याही मनात आहेत, असे मोदी यांनी नमूद केले. ओराकांडी हे हिंदू मटुआ समुदायाचे श्रद्धास्थान आहे. त्या संदर्भात मोदी म्हणाले, की ओराकांडी येथे भारत मुलींसाठी एक माध्यमिक आणि एक प्राथमिक शाळा सुरू करील. याच ठिकाणी हरिचंद ठाकूर यांनी आध्यात्मिक संदेश दिला होता. करोना महासाथीच्या काळात भारत आणि बांगलादेश यांनी आपल्या क्षमता सिद्ध केल्या. दोन्ही देश या साथीचा एकत्रित मुकाबला करीत आहेत. भारतात तयार झालेल्या लशीच्या मात्रा बांगलादेशला देण्यात आल्या आहेत.

तिस्ता पाणीवाटप वाद सोडवण्याचा पुनरुच्चार  दीर्घकाळ प्रलंबित असलेला तिस्ता जलवाटप वाद सोडवण्यासाठी भारत बांधिल असल्याचा पुनरुच्चार पंतप्रधान मोदी यांनी बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना यांच्याशी चर्चेदरम्यान केला. यावेळी दळणवळण, वाणिज्य, माहिती-तंत्रज्ञान, क्रीडा या क्षेत्रांतील पाच करारांवर दोन्ही देशांच्या प्रमुखांनी स्वाक्षरी केली.