अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कन्या इवान्का नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात भारत दौऱ्यावर येणार आहेत. हैदराबादमध्ये होणाऱ्या जागतिक उद्योजकता शिखर परिषदेला त्या उपस्थित राहतील. साऊथ ब्लॉकच्या सूत्रांनी इंडियन एक्स्प्रेसला ही माहिती दिली. या परिषदेला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत. अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा यांनी २०१० मध्ये या परिषदेची सुरूवात केली होती. हे यंदाचे आठवे वर्ष आहे.

यावर्षी जूनमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेच्या दौऱ्यावर गेले होते. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि मोदी यांची ही पहिलीच भेट होती. त्यावेळी मोदींनी ट्रम्प यांना सहकुटुंब भारतभेटीचे निमंत्रण दिलं होतं. ट्रम्प यांची कन्या इवान्का यांनी मोदींचं निमंत्रण स्वीकारलं होतं. भारतभेटीचं निमंत्रण दिल्याबद्दल त्यांनी मोदींचे आभारही मानले होते. ही परिषद कुठे घेण्यात येणार आहे, यावर गेल्या दीड महिन्यापासून विचार सुरू होता. सुरुवातीला ही परिषद मुंबई, दिल्ली आणि बंगळुरूत घ्यायचा विचार होता. पण अखेर हैदराबाद हे ठिकाण निवडले. केंद्र सरकारनं परिषदेच्या आयोजनाची जबाबदारी नीती आयोगावर सोपवली आहे. परराष्ट्र मंत्रालय आणि आंध्र प्रदेश सरकारच्या सहकार्यानं नीती आयोग या परिषदेचं आयोजन करणार आहे. ही परिषद पहिल्यांदाच भारतात होणार असल्यानं ‘मेगा इव्हेंट’प्रमाणं या परिषदेचं आयोजन करण्यात यावं, असं मोदींनी सांगितलं आहे. पहिली शिखर परिषद वॉशिंग्टन डीसी येथे २०१० मध्ये पार पडली होती. त्यानंतर इस्तंबूल, दुबई, क्वालालंपूर, मारेकेश, नैरोबी आणि सिलिकॉन व्हॅली येथे आयोजन करण्यात आलं होतं. ही शिखर परिषद पहिल्यांदाच भारतात होणार आहे.