देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज(शनिवार) नौदलाच्या ‘आयएनएस विक्रमादित्य’ या युद्धनौकेची पाहणी केली. गोवा येथील भारतीय नौदलाच्या तळावर दाखल झाल्यानंतर पंतप्रधानांना नौदलातर्फे मानवंदना देण्यात आली. या पाहणीदरम्यान नौदलाच्या अधिकाऱ्यांनी नरेंद्र मोदी यांना ‘आयएनएस विक्रमादित्य’च्या वैशिष्ट्यांविषयी माहिती दिली.
या भेटीनंतर नौदलाला संबोधित करताना नरेंद्र मोदींनी देशाची सुरक्षा हा आपल्यासाठी सर्वोच्च प्राधान्याचा मुद्दा असल्याचे सांगितले. देशाच्या सुरक्षेचा प्रश्न उदभवल्यास जगातील कोणत्याही राष्ट्राशी मुकाबला करण्यासाठी भारताने सज्ज असले पाहिजे. भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचे मजबुतीकरण करण्यामागे कोणालाही घाबरवणे किंवा नमते घ्यायला लावणे हा आपला उद्देश नसल्याचे मोदींनी यावेळी स्पष्ट केले. लष्करी दलातील जवानांच्या दृष्टीने महत्वपूर्ण असणाऱ्या ‘वन रँक वन पेन्शन’ योजनेसंदर्भातसुद्धा त्यांनी यावेळी भाष्य केले. आजपर्यंत या योजनेसंदर्भात केवळ आश्वासने देण्यात आली. मात्र, आमचे सरकार ‘वन रँक वन पेन्शन’ अंमलात आणण्यासाठी कटिबद्ध राहील असे आश्वासन नरेंद्र मोदींनी दिले.
‘आयएनएस विक्रमादित्य’ ही भारताची दुसरी विमानवाहू नौका असून, या युद्धनौकेच्या ताफ्यात असणाऱ्या मिग-२९ आणि अन्य विमानांचीसुद्धा नरेंद्र मोदींनी यावेळी पाहणी केली. रशियन बनावटीच्या ‘आयएनएस विक्रमादित्य’चे वजन ४४,५०० टन असून, ती रशियाकडून पंधरा हजार कोटी रुपयांना विकत घेतली आहे.