लोकसभा निवडणुकीतील अभूतपूर्व यशानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी अहमदाबाद येथे जाऊन आईचे आशीर्वाद घेतले. निवासस्थानी मोदी यांनी आई हिराबेन यांची भेट घेतली घेतली. मोदी यांच्या आई त्यांच्या लहान मुलाकडे, पंकज मोदी यांच्याकडे राहतात. याप्रसंगी रस्त्याच्या दुतर्फा भाजपा समर्थकांनी गर्दी केली होती. ‘मोदी, मोदी’चे नारेही याप्रसंगी देण्यात आले. मोदींसोबत भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह हे देखील उपस्थित होते.

यापूर्वी, १७ सप्टेंबर, २३ एप्रिल २०१९ आणि ५ मार्च २०१९ रोजी पंतप्रधान मोदी आईला भेटण्यासाठी अहमदाबादमध्ये घरी गेले होते. तर १६ मे २०१६ रोजी मोदी यांच्या आई दिल्लीमधील पंतप्रधानांच्या निवासस्थानी गेल्या होत्या.

नरेंद्र मोदीं यांचं रविवारी सायंकाळी अहमदाबाद विमानतळावर आगमन झाले. त्यानंतर मोदी यांनी सरदार वल्लभाई पटेल यांच्या पुतळ्याला श्रद्धांजली अर्पण केली. त्यावेळी भाजपा अध्यक्ष अमित शाह आणि गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपवानी उपस्थित होते. सरदार पटेल यांच्या पुतळ्याला श्रद्धांजली अर्पण केल्यानंतर गुजरात भाजपा कार्यलयापर्यंत रोड शो करण्यात आला. ५० वर्ष जुने भाजपा कार्यलयाबाहेर झालेल्या सभेमध्ये मोदी यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले.

सहाव्या टप्यातील मतदानांनंतर ३०० पेक्षा जास्त जागा मिळतील असा मला विश्वास विश्वास होता. हे मी दुसऱ्यांना सांगितले त्यावेळी माझी खिल्ली उडवली होती. पण, निकाल सर्वांसमोर आले. भारतीयांनी मला ऐतिहासिक विजय मिळवून दिला. लोकांनी ठरवले होते की पुन्हा एकदा मजबूत सरकार द्यायचे आहे. म्हणूनच पुन्हा एकदा आम्हाला संधी दिल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.

लोकसभा निवडणुकीत ३०३ जागा मिळवत भाजपाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली अभूतपूर्व यश मिळवलं. तर एनडीएला ३५० पेक्षा जास्त जागा मिळाल्या. ३० मे रोजी मोदी पुन्हा एकदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहे.