देशाची एकात्मता आणि सार्वभौमत्वाला धक्का पोहोचत असल्याचा आधारे भारत सरकारने सोमवारी टिकटॉक, शेअरइट, हॅलो, ब्युटी प्लस या लोकप्रिय चिनी अ‍ॅपसह एकूण ५९ अ‍ॅपवर बंदी घातली. या निर्णयानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही चीनमधील लोकप्रिय सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवरुन आपले अकाउंट डिलीट केलं आहे. पंतप्रधान मोदींनी घेतलेल्या या निर्णयाची माहिती एएनआय या वृत्तसंस्थेनं दिली आहे.

भारताने ५९  चिनी अ‍ॅपवर बंदी घालण्याचा निर्णय घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही चीनमध्ये लोकप्रिय असणाऱ्या विबो या सोशल नेटवर्किंग साइटवरील आपले अधिकृत अकाउंट बंद केलं आहे. मोदींनी काही वर्षांपूर्वी या प्लॅटफॉर्मवर अकाउंट सुरु केलं होतं, असं एएनआयने म्हटलं आहे. मात्र लडाख सीमेवरील धुमश्चक्रीनंतर भारत-चीन यांच्यात निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर मोदींनी हे अकाउंट बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

मोदी २०१४ साली पंतप्रधान झाल्यानंतर २०१५ साली पहिल्यांदा पंतप्रदान म्हणून चीन दौऱ्यावर जाण्याआधी हे अकाउंट सुरु करण्यात आलं होतं. या अकाउंटवर २ लाख ४४ हजार फॉलोअर्स होते. यापैकी बहुतांशी फॉलोअर्स हे चिनी आहेत. मोदींनी २०१५ साली या अकाउंटवरुन चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांना वाढदिवसाच्या शुभेच्छाही दिल्या होत्या. बुधावारी या अकाउंटवरील मोदींचा फोटो, कव्हर फोटो सारे काही काढून टाकण्यात आलं आणि हे अकाउंट बंद करण्यात आलं आहे.

…म्हणून भारताने घातली बंदी

वापरकर्त्यांची माहितीचोरी, तिचा गैरवापर, राष्ट्रीय सुरक्षेला धोका आणि नागरिकांची मागणी यांच्या आधारे  बंदी घालण्यात आल्याचे माहिती तंत्रज्ञान खात्याने निवेदनाद्वारे स्पष्ट केले. देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेला धोकादायक असलेले घटक या माहितीचा गैरवापर करीत असून त्याद्वारे देशाची एकात्मता आणि सार्वभौमत्वाला धक्का पोहोचत आहे. ही अतिशय गंभीर आणि चिंताजनक बाब असून त्यावर तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे, असे केंद्रीय प्रसारण मंत्रालयाने ५९  चिनी अ‍ॅपवरील बंदीचे आदेश जारी करताना म्हटलं आहे. हे हानीकारक अ‍ॅप बंद करण्यासंदर्भात केंद्रीय गृहमंत्रालयानेही सूचना केली होती. तसेच नागरिकांतूनही या अ‍ॅपबाबत तक्रारी येत होत्या, असेही मंत्रालयाने या आदेशांत म्हटले आहे.

केंद्रीय माहिती प्रसारण मंत्रालयाने माहिती तंत्रज्ञान कायद्यातील तरतुदींचा आधार घेत ही कारवाई केली. माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ‘६९अ’ मधील तरतुदींचा आधार घेत ५९ अ‍ॅपवर बंदी आणण्यात आल्याचे केंद्र सरकारने जाहीर केले. अँड्रॉइड आणि आयओएस प्रणालींवर प्रचलित असलेल्या या अ‍ॅपकडून भारतीय वापरकर्त्यांची माहिती बेकायदा साठवून भारताबाहेरील सव्‍‌र्हरना पुरवली जात असल्याच्या तक्रारी विविध माध्यमांतून करण्यात आल्या होत्या.