पुलवामा येथे झालेल्या सीआरपीएफच्या ताफ्यावरील हल्ल्यामध्ये ४० जवान शहीद झाले होते. यामध्ये बिहारमधील दोन जवानांचाही समावेश असून त्यांच्या हौतात्म्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी श्रद्धांजली वाहिली. तसेच येथील नागरिकांना संबोधीत करताना तुमच्या मनात जी खदखद आहे, तीच खदखद माझ्यातही असल्याचे त्यांनी म्हटले आहे. बरौनी जिल्ह्यात विकासकामांच्या उद्घाटनादरम्यान ते जाहीर सभेत बोलत होते.


मोदींनी येथे पाटणा मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे भुमिपुजन तसेच इतर डझनभर विकासकामांचे उद्घाटन केले. या कार्यक्रमांमध्ये बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार आणि उपमुख्यमंत्री सुशील मोदी हे देखील सहभागी झाले होते.


१४ फेब्रुवारी रोजी पुलवामात झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पाटणाच्या मसौढी येथील संजयकुमार सिन्हा आणि भागलपूरचे रत्नकुमार ठाकूर हे दोन जवान शहीद झाले होते. या शहीदांना नमन करताना मोदी म्हणाले, तुमच्या आणि देशवासीयांच्या मनात खदखदत आहे, याची मला जाणीव आहे. अशीच खदखद माझ्यामध्येही आहे, असे मोदी त्यांचे सांत्वन करताना म्हणाले.


मोदी म्हणाले, बिहार आणि पूर्व भारतामध्ये बदल घडवून आणणारा पंतप्रधान ऊर्जा गंगा योजना जाहीर करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, ओडीशा ही राज्ये गॅस पाईपलाईनने जोडली जाणार आहेत.