पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ट्विटर आणि फेसबुकवर फॉलोअर्सची संख्या कोट्यवधी आहे. पंतप्रधानांना अकाउंट चालवण्यासाठी किती खर्च येतो अशी विचारणा पंतप्रधान कार्यालयाला करण्यात आली होती. पंतप्रधान मोदी यांच्या सोशल मिडियाच्या सर्व अकाउंटसाठी किती खर्च झाला आहे तसेच सोशल मिडिया कॅम्पेनवर, व्यवस्थापनावर किती खर्च झाला आहे असे पंतप्रधानांना विचारण्यात आले. २०१४ पासून ते आतापर्यंत सोशल मिडियाच्या कॅम्पेनसाठी ‘शून्य’ रुपये खर्च आला आहे अशी माहिती पंतप्रधान कार्यालयाने दिली आहे.

आप नेते आणि दिल्लीचे उप-मुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी माहिती अधिकाराच्या कायद्याखाली ही माहिती विचारली होती. पंतप्रधान कार्यालयाकडून चालवण्यात येणाऱ्या कुठल्याही अकाउंटवर अतिरिक्त खर्च झाला नाही असे पंतप्रधान कार्यालयाने म्हटले आहे. ट्विटर, फेसबुक, युट्युब आणि गुगल अकाउंटवर आतापर्यंत कुठलेही पेड कॅम्पेन चालवण्यात आले नाही असे त्यांनी सांगितले आहे.

पंतप्रधान कार्यालयाने पीएमओ इंडिया हे अॅप तयार केले आहे. हे अॅप तयार करण्यासाठी देखील पंतप्रधान कार्यालयाला खर्च झाला नसल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. त्याचे कारण म्हणजे हे अॅप तयार करण्यासाठी विद्यार्थ्यांची एक स्पर्धा घेण्यात आली होती. ज्याचे अॅप सर्वोत्तम होईल त्याला बक्षीस देण्यात येईल तसेच पंतप्रधान कार्यालयाचे ते अधिकृत अॅप बनवले जाईल असे जाहीर करण्यात आले होते. या स्पर्धेत देशातील अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या अॅपच्या बक्षीसाची रक्कम गुगलने दिली असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

त्यामुळे या अॅपच्या निर्मितीचा खर्च देखील आला नाही असे स्पष्ट करण्यात आले.  पीएमओ इंडिया व्यतिरिक्त पंतप्रधानांचे दुसरे अॅप आहे. नरेंद्र मोदी अॅप त्यांचे हे अॅप पीएमओद्वारे चालवण्यात येत नाही. त्यामुळे त्याच्या खर्चाची आपल्याकडे माहिती नाही असे पंतप्रधान कार्यालयाने सांगितले. नरेंद्र मोदी अॅपवर पंतप्रधानांची भाषणे आणि त्यांच्या कार्यक्रमाची माहिती उपलब्ध आहे. पंतप्रधानांशी जोडले जाण्याचे ते सर्वात सोपे माध्यम आहे. हे अॅप भारतीय जनता पक्षाने बनवले असून त्यांच्या तर्फेच ते चालवले जाते. सध्या पंतप्रधानांच्या मन की बात या कार्यक्रमामुळे ऑल इंडिया रेडियोला ४.८० कोटी रुपयांचा महसूल मिळत असल्याचे अधिकाऱ्यांनी म्हटले.