भारतीय जनतेच्या इच्छा आकांक्षांचे केंद्र असणाऱ्या संसद भवनावर दहशतवादी हल्ल्याला आज १६ वर्षे पूर्ण झाली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक संसद सदस्यांनी संसद भवन परिसरातील शहिदांच्या स्मारकाला भेट देऊन श्रद्धांजली वाहिली. यावेळी माजी पंतप्रधान मनमोहनसिंग, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, सोनिया गांधी, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

१३ डिसेंबर २००१ मध्ये ५ दहशतवाद्यांनी संसद भवनावर हल्ला केला होता. दहशतवादी एका अँबेसिडर कारमधून थेट संसदेच्या आवारात घुसले होते. त्यानंतर दिल्ली पोलिसांच्या सुरक्षा रक्षकांसोबत त्यांची चकमक झाली. यामध्ये दिल्ली पोलिसांचे ६ जवान, संसद सुरक्षा सेवेचे २ सुरक्षा रक्षक शहीद झाले होते. तसेच एका माळीकाम करणाऱ्या व्यक्तीचा यात मृत्यू झाला होता. सुरक्षा रक्षकांनी या दरम्यान पाचही दहशतवाद्यांना कंठस्नान घातले होते.


अफजल गुरु हा हल्ल्यामागचा सूत्रधार होता. अफजलवरील दोषारोप सिद्ध झाल्याने त्याला सुप्रीम कोर्टाने ४ ऑगस्ट २००५ रोजी फाशीची शिक्षा सुनावली होती. ३ ऑक्टोबर २००६ रोजी अफजलची पत्नी तब्बसुम यांनी राष्ट्रपतींजवळ दया याचिका दाखल केली होती. त्यानंतर राष्ट्रपतींनी या दयाअर्जावर गृहमंत्रालयाचे मत मागवले होते. मंत्रालयाने अफजल गुरुची फाईल दिल्ली सरकारकडे पाठवून दिली होती. दिल्ली सरकारने हा अर्ज फेटाळून लावत पुन्हा गृहमंत्रालयाकडे पाठवून दिला होता. त्यानंतर अफजलच्या फाशीवर शिक्कामोर्तब करीत गृहमंत्रालयाने याची फाईल पुन्हा राष्ट्रपतींकडे पाठवून दिली होती.

त्यानंतर ३ फेब्रुवारी २०१३ रोजी ऱाष्ट्रपतींनी अफजलची दया याचिका फेटाळून लावली आणि ९ फेब्रुवारी २०१३ रोजी अफजल गुरुला दिल्लीच्या तिहार तुरूंगामध्ये फाशी देण्यात आली.