निश्चलनीकरणाच्या निर्णयाविरुद्ध आवाज उठवणाऱ्या इतर पक्षांना पंतप्रधान नरेंद्र मोदी धमकावत असल्याचा आरोप पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सोमवारी केला. लोकांना प्रचंड त्रास सहन कराव्या लागणाऱ्या केंद्राच्या या निर्णयाला विरोध करण्यासाठी आपण मंगळवारी दिल्लीच्या रस्त्यावर उतरणार असल्याचे त्यांनी सांगितले.

निश्चलनीकरणाविरोधात बोलणाऱ्या इतर पक्षांना पंतप्रधान धमकावत आहेत. पंतप्रधानांची वागणूक एका पंतप्रधानासारखीच असायला हवी. गरज भासल्यास त्यांनी या मुद्दय़ावर एक सर्वपक्षीय बैठक बोलवावी, असे बॅनर्जी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. हा अहंकाराचा लढा नाही. निश्चलनीकरणाबाबत कृती योजना असायला हवी. हा मुद्दा सोडवण्यासाठी आपण सर्व मिळून काम करायला हवे. लोकांना फार त्रास होत आहे, असे ममता म्हणाल्या. पंतप्रधानांच्या धमकीमुळे काही पक्ष आवाज उठवण्यात असमर्थ आहेत, पण मी झुकणार नाही आणि विरोध करणे सुरूच ठेवीन. भलेही मला तुरुंगात टाकले तरी बेहत्तर, असे ममता बॅनर्जीनी सांगितले.  कोटय़वधी रुपयांच्या चिट फंड घोटाळ्यांमागे असणाऱ्या लोकांना निश्चलनीकरणाचा जबर फटका बसला असल्याने ते माझ्यावर हल्ला करीत आहेत, असे पंतप्रधान मोदी यांनी अप्रत्यक्षपणे ममता बॅनर्जीना उद्देशून रविवारी आग्य्रातील सभेत सांगितले होते.