पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मन की बातद्वारे संपूर्ण देशाशी संवाद साधणार आहेत. आज सकाळी ११ वाजता रेडिओच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाशी संवाद साधतील. सकाळी ११ वाजता मन की बात हा रेडिओ कार्यक्रम असणार आहे. २० लाख कोटींचं पॅकेज, लॉकडाउनचा पुढचा टप्पा, आत्मनिर्भर भारत या सगळ्या गोष्टींचा या मन की बातमध्ये समावेश असणार आहे. असं असलं तरीही पंतप्रधान नरेंद्र मोदी काय बोलणार याकडे देशाचं लक्ष लागून राहिलं आहे.

देशातील करोनाग्रस्तांची संख्या ६ लाखांपर्यंत पोहचण्याच्या जवळ गेली आहे. यातले साधारणतः तीन लाख रुग्ण बरे झाले आहेत. केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांनीही काल भारताचा रिकव्हरी रेट अर्थात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे ५८ टक्के झाल्याचं स्पष्ट केलं. या सगळ्यावरही पंतप्रधान नरेंद्र मोदी भाष्य करण्याची शक्यता आहे. दरम्यान काल काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी करोनाच्या संकटापुढे हात टेकले आहेत अशी टीका केली होती. तसंच देशाच्या अनेक भागांमध्ये करोना पसरला आहे तरीही सरकारकडे काही उपाय योजना नाहीत असंही त्यांनी म्हटलं होतं. या आरोपांना पंतप्रधान नरेंद्र मोदी काही उत्तर देणार का? हेही पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.