उत्तर प्रदेशमध्ये निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान आज पूर्ण झाले.  तर, उर्वरित टप्प्यांचा प्रचारही जोरात सुरू होता. फतेहपूर येथील सभेमध्ये समाजवादी पक्षावर टीका करताना पंतप्रधान मोदी यांनी वादग्रस्त विधान केले. या विधानामुळे सोशल माध्यमांवरुन पंतप्रधानांवर टीकेची झोड उठत आहे. जर एखाद्या गावात दफनभूमी असेल तर स्मशानही असावे आणि जर रमजानला वीज येत असेल तर दिवाळीलाही यावी असे विधान पंतप्रधानांनी केले.

उत्तर प्रदेशची निवडणूक ही नेहमीच जातीय समीकरणे आणि हिंदू-मुस्लीम तणाव या पार्श्वभूमीवर लढवली जाते. उत्तर प्रदेशची निवडणूक सात टप्प्यांमध्ये होणार आहे. त्यापैकी तीन टप्पे पूर्ण झाले आहेत. आतापर्यंत ही निवडणूक विकास, भ्रष्टाचार, शासन, प्रशासन, कायदा-सुव्यवस्था या मुद्दांभोवती फिरत होती. महिन्याभरापासून प्रचाराला सुरुवात झाला आहे परंतु आतापर्यंत एकाही प्रमुख नेत्याने जात-धर्माचा जाहीर संदर्भ दिला नव्हता. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी फतेहपूर येथे झालेल्या जाहीर सभेत याला सुरुवात केली आहे.

उत्तर प्रदेशला वीजेचा समस्येने ग्रासले आहे. त्या समस्येतून सुटका करण्याचे आश्वासन द्यायचे सोडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मात्र अखिलेशच्या सरकारमध्ये रमजानमध्ये वीज उपलब्ध असते आणि हिंदूंना दिवाळीला वीज मिळत नाही असे सुचवले. समाजवादीच्या काळात मुस्लिमांना दफनभूमी तर मिळते परंतु प्रत्येक गावात स्मशान मात्र नाही असे त्यांनी म्हटले. पुढे ते म्हणाले, जाती-धर्माच्या आधारावर भेदभाव होणे योग्य नाही. समाजवादीच्या काळात जाती-धर्मावर भेदभाव झाले आहेत, आपल्या काळात मात्र असे होणार नाही असे ते म्हणाले. जाती-धर्माचे राजकारण संपवावे असे म्हणत असतानाच त्यांनी जाती-धर्माचा आधार घेऊन टीका केली.

उत्तर प्रदेशाच्या निवडणुकीचे चार टप्पे बाकी आहेत. मतदारांचा स्पष्ट कौल कुठल्या बाजूला आहे हे कळणे अवघड झाले आहे. तेव्हा आपल्या पारड्यामध्ये आपल्या हक्कांची मते मिळवण्यासाठी रमजान-दिवाळीचे वक्तव्य केले की काय अशीच शंका व्यक्त होत आहे. काँग्रेसने त्यांच्या या विधानावर जोरदार टीका केली आहे. पंतप्रधानांचे हे वक्तव्य मतांच्या ध्रुवीकरणासाठी आहे असे त्यांनी म्हटले आहे.  दोन्ही धर्मियांच्या कल्याणाचा विचार केला असता दफनभूमी आणि स्मशानांपेक्षा जास्त गरज रुग्णालयांची आहे, यावर कुणाचे दुमत होणार नाही. गेल्या काही वर्षांमध्ये सार्वजनिक आरोग्य व्यवस्था खालावली आहे. हा प्रश्न प्राधान्याने सोडवणे आवश्यक आहे. रमजान-दिवाळीला वीज येण्याने उत्तर प्रदेशातील प्रश्न सुटणार नाही. वर्षभरातील सर्व दिवस वीज मिळाली तरच शेती आणि उद्योगधंद्याला त्याचा फायदा होईल.