पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी ११ रेडियो कार्यक्रम ‘मन की बात’च्या माध्यमातून देशातील नागरिकांशी संवाद साधणार आहे. आज जानेवारी महिन्याचा शेवटचा रविवार आहे व नवीन वर्ष (२०२१) मध्ये होत असलेला हा पहिलाच कार्यक्रम आहे. पंतप्रधान मोदी यांचा ‘मन की बात’ कार्यक्रम प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी प्रसारित होतो.
पंतप्रधानांनी शनिवारी त्यांच्या ट्विटर हॅण्डलवरुन ट्विट करत नागरिकांना आजचा ‘मन की बात’ कार्यक्रम एकण्याचं आवाहन केलं आहे.

सध्या दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलना दरम्यान प्रजासत्ताक दिनी निघालेल्या ट्रॅक्टर मोर्चा दरम्यान उफाळलेला हिंसाचा व यामध्ये जखमी झालेले पोलीस व सार्वजनिक मालमत्तेचं झालेलं मोठं नुकसान, लाल किल्ल्यावर चढलेले आंदोलक व त्यानंतर संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या सुरूवातीस शेतकरी आंदोलनाविषयी सरकारच्या भूमिकेवर टीका करत विरोधी पक्षांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर टाकलेला बहिष्कार इत्यादी प्रमुख मुद्द्यांचा आजच्या मन की बात कार्यक्रमात समावेश होण्याची शक्यता दिसत आहे. याचसोबतच भारत-चीन सीमावादावरही पंतप्रधान मोदी भाष्य करण्याची शकतात .

या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी कोणत्या विषयावर बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तर, या अगोदर शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बोलताना पंतप्रधान मोदी यांनी,”मी नरेंद्र सिंह तौमर यांनी सांगितलेलाच मुद्दा पुन्हा एकदा सांगू इच्छितो. शेतकरी आणि सरकार यांच्यात अंतिम तोडगा भलेही निघाला नसेल, पण सरकार शेतकऱ्यांसमोर पर्याय ठेवत आहे. शेतकऱ्यांनी यावर चर्चा करावी.” असं सांगितलं होतं. तसेच, शेतकऱ्यांपासून आपण फक्त एका कॉलच्या अंतरावर आहेत, असंही मोदी म्हणाले होते.