अलिगढ मुस्लिम विद्यापीठाला १०० वर्ष पूर्ण होत आहेत, त्यानिमित्ताने आयोजित करण्यात येणाऱ्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. २२ डिसेंबरला हा कार्यक्रम होणार आहे. अलिगढ मुस्लिम विद्यापीठ हे देशातील एक जुने विद्यापीठ आहे. कुठल्याही विद्यापाठीच्या इतिहासात शताब्दी वर्ष ही एक ऐतिहासिक घटना आहे. “आमचं निमंत्रण स्वीकारल्याबद्दल मी अलीगढ मुस्लिम विद्यापीठाच्यावतीने पंतप्रधानांचे आभार मानतो. या ऐतिहासिक कार्यक्रमाला पंतप्रधानांच्या उपस्थितीमुळे विद्यापीठाच्या विकासात मदत होणार आहे” असे व्हाइस चान्सलर तारिक मन्सूर यांनी सांगितले. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरीयाला निशंक सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.

यापूर्वी दिवंगत पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री १९६४ साली अलीगढ मुस्लिम विद्यापीठाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले होते. पंतप्रधानपदावर असताना अलीगढ मुस्लिम विद्यापीठाच्या कार्यक्रमात सहभागी होणारे ते शेवटचे पंतप्रधान होते. त्यानंतर आता मोदी विद्यापीठाच्या कार्यक्रमात सहभागी होतील. एएमयूच्या अधिकाऱ्यांनी आधी राष्ट्रपती रामनाथ कोविंद विद्यापीठाच्या शतक महोत्सवी कार्यक्रमाला उपस्थित राहतील, असे टाइम्स ऑफ इंडियाला सांगितले होते.

पण राष्ट्रपती आता २०२१ च्या फेब्रुवारीमध्ये विद्यापीठाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. करोना व्हायरसच्या साथीमुळे सर्व कार्यक्रम ऑनलाइन पद्धतीने होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींची उपस्थिती, हा सतत अलीगढ मुस्लिम विद्यापीठावर टीका करणाऱ्या भाजपा पदाधिकाऱ्यांना कठोर संदेश असेल असे एएमयूच्या अधिकाऱ्याने टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना सांगितले. एएमयूमध्ये सीएए विरोधात निदर्शने करण्यात आली होती. या विद्यापीठातील विद्यार्थी उत्तर प्रदेशातील महिलांवरील हिंसाचाराविरोधात आवाज उठवतात तसेच आता दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनालाही त्यांचा पाठिंबा आहे. त्यामुळे या विद्यापीठाच्या कार्यक्रमाला पंतप्रधान मोदींची उपस्थिती ही विशेष बाब आहे.