पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांनी सलग तिसऱ्यांदा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. राज्यपाल जगदीप धनकर यांनी आज (बुधवार) त्यांना शपथ दिली. ममता बॅनर्जी यांच्या पक्षाच्या तृणमूल कॉंग्रेसने निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला मोठ्या मतांनी पराभूत केले आहे. मतमोजणीनंतर तृणमूलच्या वाट्यात २३१ जागा आणि भाजपच्या वाट्यात ७७ जागा, डाव्या आणि इतरांना १-१ जागा आल्या आहेत. ही निवडणूक भाजपासाठी आव्हानात्मक होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहादेखील प्रचारासाठी मैदानात उतरले होते. मात्र भाजपाला १०० जागांचा आकडा देखील गाठता आला नाही. दरम्यान, शपथविधीनंतर नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

“पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याबद्दल ममतादीदींचे अभिनंदन,” असे ट्विट करत नरेंद्र मोदी यांनी ममता बॅनर्जी यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

 

शपथविधी सोहळ्यात राज्यपाल धनकर, टीएमसी नेते आणि अभिषेक बॅनर्जी आणि पक्षाचे राजकीय रणनीतिकार प्रशांत किशोर उपस्थि होते. बंगालमध्ये आता ममता बॅनर्जी यांच्यासमोर करोना साथ रोखण्याचे मोठं आव्हान आहे. कोविडच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी ममता बॅनर्जी बैठक घेणार आहेत. करोनाचा सामना करण्याला प्रथम प्राधान्य असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

या शपथविधीनंतर राज्यपाल धनकर यांनी ममता बॅनर्जींचं अभिनंदन केलं आणि सध्या चाललेला हिंसाचार थांबवून पुन्हा एकदा शांतता व सुव्यवस्था स्थापन करण्यास सांगितलं आहे.

गेल्या दोन दिवसांत पश्चिम बंगालमध्ये झालेल्या हिंसाचारात १४ जणांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं जात आहे. ममता यांनी लवकरात लवकर हा हिंसाचार थांबवण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. दरम्यान, भाजपा अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी ममता बॅनर्जी यांच्या शपथविधी सोहळ्यावर टीकास्त्र सोडलं. नड्डा म्हणाले, “ते शपथ घेऊ शकतात. प्रत्येकाला लोकशाहीने हा अधिकार दिलेला आहे. पण आम्हीही ही शपथ घेतो की आम्ही बंगालमधल्या राजकीय हिंसाचाराचा नायनाट करु”.