अवकाश संशोधनाच्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या शास्त्रज्ञांमुळे कोट्यवधी लोकांच्या आयुष्यात बदल झाले असल्याचे गौरवोदगार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी श्रीहरिकोटा येथील भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या (इस्रो) कार्यक्रमात काढले.
फोटो गॅलरी : ‘पीएसएलव्ही सी-२३’ प्रक्षेपकाचे यशस्वी उड्डाण
पाच परदेशी उपग्रह असलेल्या पीएसएलव्ही सी २३ या प्रक्षेपकाने सोमवारी सकाळी यशस्वीपणे उड्डाण केले. हा उड्डाण कार्यक्रम बघण्यासाठी नरेंद्र मोदी स्वतः शास्त्रज्ञांसमवेत श्रीहरिकोटा येथील केंद्रात उपस्थित होते. पीएसएलव्ही सी २३ ने यशस्वी उड्डाण केल्यानंतर नरेंद्र मोदी यांना उपस्थित शास्त्रज्ञांशी संवाद साधला. केंद्रीय मंत्री वैंकय्या नायडू, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यावेळी उपस्थित होते.
सार्क उपग्रह मोहीम
भारताच्या शेजारी देशांसाठी ‘इस्रो’ने नवा सार्क उपग्रह अवकाशात सोडण्याची मोहीम हाती घ्यावी, अशी इच्छा नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली. शेजारी देशांना या उपग्रहाचा त्यांच्या देशातील गरिबी दूर करण्यासाठी आणि विकास साधण्यासाठी उपयोग व्हावा, अशीही अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
मोदी म्हणाले, उपनिषदांपासून सुरू झालेला भारतीय संस्कृतीचा प्रवास आता उपग्रहांपर्यंत येऊन पोचला आहे. अनेक शास्त्रज्ञांनी आपले आयुष्य अवकाश संशोधनाच्या क्षेत्रात समर्पित केले. अपुऱया साधनसुविधा असतानाही शास्त्रज्ञांच्या समर्पित सेवेच्या वृत्तीमुळेच आपण आज इथपर्यंत मजल मारली. आज भारताने सर्व परदेशी उपग्रह आपल्या प्रक्षेपकाद्वारे अवकाशात पाठविले. अत्यंत कमी खर्चात ही सुविधा उपलब्ध करून दिल्यामुळे वेगवेगळे देश भारताकडे येत आहेत. प्रत्येक भारतीयाची मान उंच व्हावी, अशीच ही घटना आहे. पीएसएलव्हीचे उड्डाण प्रत्यक्ष बघणे ही माझ्यासाठीही अभिमानाची गोष्ट आहे.
फ्रान्सचा पृथ्वी निरीक्षण उपग्रह स्पॉट ७ (वजन ७१४ किलो) जर्मनीचा आयसॅट (१४ किलो), कॅनडाचे १५ किलो वजनाचे दोन उपग्रह तर सिंगापूरचा व्हेलॉक्स १ हा ७ किलो वजनाचा उपग्रह यांचा आजच्या उड्डाणांमध्ये समावेश आहे. कॅनडाचे एनएलएस ७.१ व एनएलएस ७.२ हे टोरांटो विद्यापीठाने तयार केलेले उपग्रहही यात आहेत. व्हेलॉक्स हा सिंगापूरच्या न्यानयांग टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीचा उपग्रह आहे.