गेल्या काही दिवसांपासून देशातील विविध भागातून बलात्काराच्या घटना समोर येत आहेत. या प्रकारांमुळे समाजात भीती निर्माण झाली आहे, असे म्हणत काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी चिंता व्यक्त केली आहे. बलात्काराच्या घटनांवरील पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मौनावरही त्यांनी प्रश्न उपस्थित केला आहे.

राहुल गांधी यांनी याप्रकरणी मंगळवारी ट्विट केले. देशात पुन्हा एकदा मुलींवर सामूहिक बलात्काराच्या घटना घडत आहेत. बलात्कार प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मौन अमान्य आहे, असे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले.

देशातील महिलांना असुरक्षित आणि दहशतीखाली ठेवणाऱ्या सरकारची लाज वाटते. इथे बलात्कारी खुलेपणाने फिरत आहेत, असेही ते म्हणाले. राहुल गांधी हे मंगळवारपासून आंध्र प्रदेशच्या दौऱ्यावर आहेत. कुरनूल येथे त्यांनी विद्यार्थी आणि पक्ष कार्यकर्त्यांबरोबर संवाद साधला.

रेवाडी सामूहिक बलात्कार प्रकरणी काँग्रेस सातत्याने हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्यावर निशाणा साधत आहे. याप्रकरणी अनेक ठिकाणी आंदोलनही करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून राहुल गांधी सातत्याने मोदी सरकारवर निशाणा साधताना दिसत आहेत. यापूर्वीही विजय मल्ल्याप्रकरणी त्यांनी अर्थमंत्री अरुण जेटली आणि केंद्र सरकारवर हल्लाबोल केला होता.